‘क्रिमिनल इटेन्सिव्ह सर्व्हिलन्स’ प्रोजेक्टद्वारे गुन्हेगारांवर नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 10:24 PM2018-09-20T22:24:50+5:302018-09-20T22:29:09+5:30
तुरुंगातून सुटलेले अथवा सध्या शहरात आलेल्या गुन्हेगारांकडूनच प्रामुख्याने गुन्हे होत असल्याने त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी क्रिमिनल इटेन्सिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे़.
विवेक भुसे
पुणे: तुरुंगातून सुटलेले अथवा सध्या शहरात आलेल्या गुन्हेगारांकडूनच प्रामुख्याने गुन्हे होत असल्याने त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी क्रिमिनल इटेन्सिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे़. नागपूरच्या धर्तीवरील या प्रकल्पात ३० पोलीस ठाण्यांमधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील १२० गुन्हेगार दररोज चेक करण्यात येणार आहे़.
पोलीस आयुक्त डॉ़ के. व्यंकटेशम यांनी अशा प्रकारचा प्रोजेक्ट स्मार्ट सिटी अंतर्गत राबविला आहे़. त्याचा नागपूरमधील गुन्हेगारांवर वचक बसून गुन्हेगारी कमी करण्यात चांगला फायदा झाला आहे़. त्याच धर्तीवर पुण्यातही हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे़. त्यासाठी नागपूर पोलीस दलातील अभियंता व कर्मचारी सध्या पुण्यात आले असून हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचे काम करीत आहेत़.
या प्रकल्पाअंतर्गत एक मध्यवर्ती सेंटर असणार आहे. त्यावरुन संपूर्ण नियंत्रण ठेवले जाणार आहे़. त्यात प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक व्हाट्सअप ग्रुप करण्यात येईल़. त्यात या पोलीस ठाण्यातील सर्व सराईत गुन्हेगारांची माहिती असेल़ प्रत्येक झोनचा एक वेगळा ग्रुप असेल व त्यात त्या विभागातील सर्व पोलीस ठाण्याचे ग्रुप अॅडमिनचा समावेश असेल़. शहरातील सर्व ३० पोलीस ठाण्यांचे रिपोर्ट मुख्य माहिती सेंटरला दिले जाईल़. तेथे हा सर्व डेटा बेस तयार केला जात आहे़.
असे चालले प्रकल्पचे काम
या प्रकल्पामध्ये एक डेटा बेस सेंटर असणार असून प्रत्येक पोलीस ठाण्यातील बीट मार्शलला रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती त्याच्या ग्रुपवर असेल़. सध्या बीट मार्शल हे आपल्या हद्दीत गस्त घालतात़. पण एखादी खबर सोडल्यास ते आपल्या पद्धतीने हद्दीत फिरत असतात़. त्याऐवजी त्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्यास सांगण्यात येणार आहे़. बीट मार्शलने गुन्हेगारांच्या राहण्याच्या ठिकाणी जाऊन तो घरी आहे का याची खात्री करायची तो असेल तर त्याचा एक फोटो घ्यायचा़. तो ग्रुपवर अपलोड करायचा़ घरी नसेल तर तो कोठे आहे, याची माहिती घरातील नातेवाईक अथवा शेजारच्याकडून माहिती घेऊन ती ग्रुपवर पाठवायची़.
यात प्रामुख्याने घरफोडी, जबरी चोरी, सोनसाखळी चोºया करणारे, खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे असणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश असणार आहे़. जर गुन्हेगार घर सोडून दुसरीकडे गेला असेल तर त्याचा नवा पत्ता मिळविण्याचा प्रयत्न बीट मार्शल, तपास पथकाने करायचा़ जर गुन्हेगार त्याच्या घरी सापडला नाही तर त्याचा शोध त्या पोलीस ठाण्यातील तपास पथक घेईल़. त्यांनाही तो सापडला नाही ते ते काम गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येईल़.
अशा प्रकारे प्रत्येक पोलीस ठाण्यातील ४ गुन्हेगार दररोज चेक करायचे व त्याची फोटो, माहिती ग्रुपवर पाठवायची आहे़ मुख्य केंद्रातून ती माहिती अपडेट केली जाईल़ त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील प्रत्येकाला हा गुन्हेगार सध्या कोठे आहे, कसा दिसतो कसा राहतो, हे समजू शकणार आहे़.
अशा प्रकारे पुणे शहरातील ३० पोलीस ठाण्यातील १२० गुन्हेगार दररोज चेक होणार आहेत़. या चेकिंगमध्येच त्याच्याविरोधात न्यायालयातील केसेस, त्याचा तारखा याविषयीही माहिती दिली जाणार आहे़. तो त्या तारखांना हजर राहील, याची काळजी संबंधितांनी घ्यायची आहे़.
गुन्हेगार तडीपार असेल तर सध्या कोठे राहत आहे़. तुरुंगात असेल तर कोणत्या गुन्ह्यात तो तुरुंगात आहे, याची नोंद त्यावर केली जाणार आहे़. पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी पूर्ण झाली की पुन्हा एकपासून त्यांचे चेकींग सुरु राहणार आहे़.
या संपूर्ण प्रकल्पावर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तांचे नियंत्रण असणार आहे़. या नियमित चेकिंगमुळे गुन्हेगाराची सर्व माहिती व सध्याच्या हालचालींची माहिती सर्वांपर्यंत पोहचते़ याशिवाय पोलिसांचे आपल्यावर लक्ष आहे़. हे गुन्हेगारांच्या लक्षात आल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट होते़ नागपूरमध्ये या प्रकल्पाला यश आल्याने पोलीस आयुक्त डॉ़ के. व्यंकटेशम यांनी तो पुण्यातही राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ येत्या काही दिवसात तो कार्यन्वित होणार आहे़.
़़़़़
तडीपारांवरही राहणार नजर
अनेकदा शहरातील काही भागात गुंड दहशत निर्माण करुन गुन्हे करत असतात़. त्यामुळे पोलीस दलाकडून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करुन त्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाते़. मात्र, काही दिवसातच ते पुन्हा लपून छपून शहरात येऊन गुन्हे करीत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे़. चतु:श्रृंगी परिसरात तर एका तडीपार घरफोड्याने ३० हून अधिक घरफोड्या तडीपार असताना केल्याचे उघड झाले आहे़. अशा गुन्हेगारांवरही या प्रकल्पातून नजर ठेवण्यात येणार आहे़.