नगरसेवकांच्या वस्तूखरेदीवर वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 03:32 AM2019-01-31T03:32:33+5:302019-01-31T03:32:53+5:30
लाभार्थीचे नाव, फोन नंबर, सहीचे रेकॉर्ड ठेवणार
पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील कोट्यवधी रुपये दर वर्षी कचऱ्याच्या बकटे, कापडी पिशव्या व अन्य वस्तू खरेदी करून नागरिकांना वाटप करण्यासाठी खर्च करण्यात येतात; परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून, यावर अंकुश ठेवण्यासाठी
प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहेत.
यामध्ये यापुढे कोणत्याही वस्तूचे वाटप करताना संबंधित लाभार्थीचे नाव, पत्ता, फोन नंबर व सही सर्व रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. सर्व माहितीची शहानिशा केल्यानंतर संबंधित ठेकेदाराला बिलाचे पैसे अदा करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने गेल्या पाच वर्षांत तब्बल १५ कोटी रुपये खर्च करून ११ लाखांपेक्षा अधिक बकेट वाटप केल्या आहेत. यंदा देखील महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये केवळ बकेट खरेदीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु आता बकेट खरेदीची गरज नसल्याचे सांगत प्रशासनाने नगरसेविकांची बकेट खरेदी रोखली होती; परंतु प्रशासनाने काही अटींवर परवानगी दिली आहे. बकेट प्रमाणेच नगरसेवकांकडून पिशव्या खरेदीवर देखील कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. याबाबत निंबाळकर म्हणाले की, नगरसेवकांकडून कापडी पिशव्याची खरेदी करण्यावर बंदी नसली, तरी यावेळी खास वॉच ठेवण्यात येणार आहे.