त्याच्या अन् तिच्या ‘फ्रेंड्स’वर स्पायचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:19 AM2018-08-06T01:19:04+5:302018-08-06T01:19:16+5:30
त्याचं होतं काय की, मम्मीला मी कोणाबरोबर बाहेर जाते, रात्रीच्यावेळी कुणाबरोबर बोलते, पार्टीला, खरेदीला, मुव्हीला रोजच्या जगण्यात जे काही घडतं ते सगळं तिला सांगावे लागते.
- युगंधर ताजणे
पुणे : त्याचं होतं काय की, मम्मीला मी कोणाबरोबर बाहेर जाते, रात्रीच्या वेळी कुणाबरोबर बोलते, पार्टीला, खरेदीला, मुव्हीला रोजच्या जगण्यात जे काही घडतं ते सगळं तिला सांगावे लागते. हे नयनाचं (नाव बदलले आहे) तिच्या मम्मीबद्द्लचं गा-हाणं. तर दुसरीकडे अमितची गोष्ट आणखी वेगळी आहे. मला तर माझ्या सगळ्या मित्रांचे फोन नंबर, त्यांच्या फँमिलीतील एक दोन जणांची नावे व मोबाईल नंबर, दरवेळी नवीन कुणी मित्र मैत्रीण घरी आली की त्यांचा बायोडाटा सगळा घरच्यांना टिपून द्यावा लागतो. अमित कुठलेही आढेवेढे न घेता हे सगळे सांगत होता. सध्या मैत्रीच्या नावाखाली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता काही पालकांकडून खासगी स्पाय नेमण्याचा प्रकार सुरू आहे.
आपला पाल्याचे मित्र कोण आहेत, ते काय करतात, कुठे राहतात, याची माहिती एका खासगी गुप्तहेराकडून मिळविण्याचा कल वाढला आहे. याकरिता गुप्तहेरांकरिता मोठी किंमत मोजली जात आहेत. हे गुप्तहेर त्या मित्रांची खडानखडा माहिती जमवून ती पालकांना देतात. ही प्रकरणे हाताळलेल्या काही गुप्तहेरांना विचारले असता ते सांगतात की, मुलांसाठी स्पाय हायर करण्याचा प्रकार एका ठराविक वर्गामध्ये पाहायला मिळतो. उच्चभ्रुवर्गातील मुलामुलींच्या मित्रवर्गाची इत्यंभुत माहिती गोळा करण्याचे मोठे आव्हान असते. मुलांच्या मित्रांबद्द्ल विशेष कुतूहल असते. त्यांच्याशी संंबंधित प्रत्येक गोष्टीची कल्पना पालकांना द्यावी लागते.
यासगळ्याचा उद्देश हाच की, मित्रांच्या संगतीने पाल्य वाममार्गाला जाऊ नये. हल्ली मैत्रीचं नाव पुढे करुन त्यानंतर होणा-या परिणामांना पाल्याला नव्हे तर पालकांना सामोरे जावे लागते. नकळतपणे हातातून चुका होतात मात्र त्याचे गंभीर पडसाद मुलामुलींच्या आयुष्यावर उमटतात. त्याचा त्रास पाल्याला पर्यायाने पालकांना सहन करावा लागतो. साधारणपणे दहावी पास झाल्यानंतर कॉलेजच्या प्रवेशव्दारातून आत शिरलेल्या पाल्यांना एका दिशेची गरज असते. त्याचवेळी कुणाएकाच्या संगतीत येवून पाल्य वेगळ्या वाटेला जाण्याचा धोका जास्त असतो.
ज्या पाल्यांवर ’’वॉच’’ ठेवायचा आहे त्यांच्या मित्राची संपूर्ण माहिती गोळा केली जाते. मुळात ही खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया असल्याने पाल्याला थोडाही संशय येऊ न देता अतिशय सावधगिरी बाळगली जाते. सध्याच्या सोशल माध्यमांच्या जगात वावरत असताना बरीचशी माहिती गोळा करण्याचे कष्ट कमी होत असले तरीदेखील सगळ्याच गोष्टींची कल्पना मिळणे अवघड होवून बसते. अशाप्रसंगी गुप्तहेर त्यांचे खास सोर्सेसचा वापर करतात. जागोजागी पेरलेली ती माणसे हवी ती माहिती कमीतकमी वेळेत देतात. त्याने तिला फसवून काही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वाधिक भीती पालकांना असल्याने खासक रुन मुलींच्याबाबत ते जास्तच सजग असल्याचे निरीक्षण गुप्तहेर नोंदवतात.
पैशांसाठी, शरीरसुख याकरिता मैत्रीचे नाटक करुन अत्याचार करणा-याचे अनेक प्रकार शहरात घडत
असून त्यापार्श्वभूमीवर मुलांवर
लक्ष ठेवण्याचा वेगळा मार्ग
उच्चभ्रु पालकवर्ग निवडताना दिसत आहेत.
>पालकांना हवे असते पूर्ण प्रोफाईल...
पालकांना पुरावा महत्वाचा असतो. तो हाती आल्यावर केस पूर्ण होते. मोठमोठ्या कुटूंबातील आई वडिलांना कामाच्या व्यापामुळे पाल्याकडे लक्ष ठेवणे शक्य नसते. बऱ्याच पालकांना भावी जावई कसा आहे, भावी सून कशी आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. त्यामागे त्यांची धोरणात्मक कारणे असतात. मुला-मुलीचे मित्र, मैत्रीणी यांचे पूर्ण प्रोफाईल त्यांना हवे असते.
- नागेश खजूरगिरीकर, खासगी गुप्तहेर