आंबटशौकिनांनो, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे गुन्हाच! मोबाईल, लॅपटॉपवर वाढली विकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 12:06 PM2021-12-30T12:06:11+5:302021-12-30T12:07:51+5:30
मोबाईल आणि लॅपटॉपवर विविध ॲप्स, साईट्स सर्च केल्या जातात. यात चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे...
पुणे : चाईल्ड पोर्नोग्राफी पाहणारे किंवा त्याचा प्रसार करणाऱ्यांनो सावधान! चाईल्ड पोर्नोग्राफी हा शब्द जरी सर्च केला तरी तुमच्यावर करडी नजर आहे हे विसरू नका. बालकांवरील लैंगिक अत्याचाराबाबतच्या ध्वनिचित्रफिती बनवून पसरविण्याबरोबरच तिचे सर्चिंग करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरीही चाईल्ड पोर्नोग्राफी पाहिली जात आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु, याबाबत गुन्हा नोंदविण्याचे प्रमाण कमी असून, वर्षभरात सायबरकडे केवळ सहा तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात एकावर गुन्हा नोंदवला आहे आणि चार अर्ज प्रलंबित आहेत.
मोबाईल आणि लॅपटॉपवर विविध ॲप्स, साईट्स सर्च केल्या जातात. यात चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र चाईल्ड पोर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर कडक पावले उचलण्यात आली आहेत. पोर्नोग्राफीसाठी मुलांचा उपयोग होऊ नये यासाठी अमेरिकेतील नॅशनल सेंटर मिसिंग अँड एक्सप्लॉईड चिल्ड्रन ही संस्था काम करते. ही संस्था चाईल्ड पोर्नोग्राफी हा शब्द जरी कुणी सर्च केला किंवा डाऊनलोड वा अपलोड केले तरी त्यांचा शोध घेऊन त्यांची माहिती केंद्र सरकारला पाठविते. केंद्राकडून महाराष्ट्र सायबर सेलला त्या वापरकर्त्यांची, त्याने डाऊनलोड आणि अपलोड केलेल्या सीडीसह माहिती पाठविली जाते. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सायबर सेलला ही माहिती कळविण्यात येते.
चाईल्ड पोर्नोग्राफी गुन्ह्याची शिक्षा काय?
चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भातील मजकूर संकलित करणे, शोधणे, ब्राऊज करणे, डाऊनलोड करणे किंवा एक्सचेंज किंवा वितरित करणे. मुलांना अश्लील, अशोभनीय किंवा लैंगिकरीत्या सुस्पष्टपणे चित्रित झाले असल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ बी (बी)-(बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. पहिल्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास पाच वर्षांपर्यंतची शिक्षा आणि १० लाख रुपयांचा दंड, दुसऱ्यांदा शिक्षा झाल्यास ७ वर्षांपर्यंतची शिक्षा व १० लाख रुपयांपर्यंतचा दंड शिवाय पॉक्सो कायद्यातील सेक्शन १४ नुसार जो बालकांचा पोर्नोग्राफीसाठी उपयोग करेल त्याला सात वर्षांची शिक्षा आहे. कलम १५ नुसार जो बालक असलेले साहित्य व्यवसायासाठी वापरेल त्याला ३ वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.
अल्पवयीन मुला-मुलींना मॉडेलिंगची भुरळ घातली जाते. त्यांच्याकडून न्यूड फोटो मागितले जातात. त्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असणारी अल्पवयीन मुले चाईल्ड पोर्नोग्राफीमध्ये अडकू शकतात. त्यामुळे अठरा वर्षांखालील मुला-मुलींना सोशल मीडिया हाताळण्यास देऊ नये. मुलांच्या हातात मोबाईल देताना योग्य ती खबरदारी पालकांनी घ्यावी.
- डी.एस. हाके, पोलीस निरीक्षक, सायबर सेल