पाण्याचा तिढा कायमच; जलसंपदाच्या इशाऱ्यावर पालिकेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:49 AM2018-03-22T03:49:14+5:302018-03-22T03:49:14+5:30
जलसंपदा विभागाने महापालिकेला दिलेल्या ३५४ कोटी रुपयांची थकबाकी जमा करा अन्यथा पाणीपुरवठा बंद करू, या इशा-यावर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत जोरदार चर्चा झाली. याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून पाणीपुरवठा बंद होणार नाही, अशी ग्वाही पाणीपुरवठा विभाागाने सभागृहाला दिली.
पुणे : जलसंपदा विभागाने महापालिकेला दिलेल्या ३५४ कोटी रुपयांची थकबाकी जमा करा अन्यथा पाणीपुरवठा बंद करू, या इशा-यावर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत जोरदार चर्चा झाली. याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून पाणीपुरवठा बंद होणार नाही, अशी ग्वाही पाणीपुरवठा विभाागाने सभागृहाला दिली.
जलसंपदा खात्याने महापालिकडे पाणी घेतल्याची तब्बल ३५४ कोटी रुपयांची थकबाकी दाखवली आहे. ती जमा केली नाही तर २० मार्चला पाणी देणे बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. २० मार्चला पाणीपुरवठा बंद झाला नाही, मात्र त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. विशाल तांबे यांनी यावरून प्रशासनाला धारेवर धरले, तर सुभाष जगताप व अन्य सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार करून प्रशासन पाण्याच्याबाबतीत दुर्लक्ष करत आहे, असा आरोप केला. याची सविस्तर माहिती सभागृहाला त्वरित देण्यात यावी, प्रशासन सर्वसाधारण सभेचा अधिकार स्वत:कडे घेऊ पाहत आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी यावर थकबाकीच्यासंदर्भात अधिकाºयांच्या बैठकीत तडजोड झाली व त्यात ४७ कोटी रुपये देण्याचे ठरले, हे पैसे देण्याचे तुम्ही कोणत्या अधिकारात ठरवले, अशी विचारणा केली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी ही रक्कम थकबाकीपैकी नाही, वेगळी आहे असे स्पष्ट केले. थकबाकीच्यासंदर्भात ते म्हणाले, की यापूर्वी ९७ टक्के पाण्याचा वापर पिण्यासाठी होत होता. तर ३ टक्के व्यावसायिक वापरासाठी. आता हे प्रमाण बदलले आहे व व्यावसायिक वापर अधिक झाला आहे. त्याची ४७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम अदा करण्यात आलेली नाही, त्यावर चर्चा सुरू आहे.
जलसंपदा विभागाने ३५४ कोटी रुपयांची अवास्तव थकबाकी दाखवली आहे. जुन्या बेबी कालव्याचे भाडे महापालिकेला लावण्यापासून ते आवश्यकतेपेक्षा जादा पाणी उचलण्यापर्यंत अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. पाण्याचे आतापर्यंत आॅडिट का केले नाही, असे सुभाष जगताप यांनी विचारले तर दरवर्षी मार्चअखेरला त्यांचे पैसे दिले का जात नाही असे विशाल तांबे म्हणाले. याबाबत प्रशासनाने त्वरित बैठक घ्यावी, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जलसंपदा खात्याने दाखवलेली थकबाकी चुकीची नाही, बरोबर आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. राज्य सरकार व जलसंपदा खाते त्यात असेल. त्यामुळे स्थानिक स्तरावर ही थकबाकी बरोबर आहे, यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. पाण्याचा व्यावसायिक वापर वाढला असल्याचे महापालिकेने प्रतिज्ञापत्रकात दिले आहे. त्यानुसार फरक काढण्यात आलेला आहे.