पाण्याच्या मशीनमधील रकमेचा अपहार? सहा महिन्यांचे पैसे कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 03:21 AM2018-04-06T03:21:38+5:302018-04-06T03:21:38+5:30
लोहगावमधील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतकाळात पाण्याचे स्वयंचलित मशीन बसवण्यात आले आहे.
विश्रांतवाडी - लोहगावमधील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतकाळात पाण्याचे स्वयंचलित मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकल्यास ग्राहकाला म्हणजे नागरिकांना एका वेळी २० लिटर पिण्याचे पाणी मिळते. मात्र लोहगावचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर मागील सुमारे ६ महिन्यांच्या कालावधीत या मशीनमध्ये जमा झालेली लाखोंच्या घरातील रक्कम पालिकेकडे जमा झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम नेमकी गेली कुठे, असा सवाल नागरिक करू लागले आहेत.
लोहगावमधील पाण्याच्या टाकीबाहेर ही मशीन बसवण्यात आली आहे. लोहगावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेकडो नागरिक मशीनमध्ये पैसे टाकून पाणी भरून घेतात. यातून मशीनमध्ये दररोज ४-५ हजार रुपये जमा होतात. ग्रामपंचायतकाळात मशीनमध्ये जमा झालेले पैसे जमा करून हिशोब ठेवला जात होता. मात्र, लोहगाव पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतचे दफ्तर पालिकेकडे जमा करण्यात आले. तसेच पाण्याच्या मशीनमध्ये जमा होणाऱ्या रकमेचा हिशोब ठेवणेही बंद झाले. त्यानंतर मशीनमध्ये जमा होणारी रक्कम पालिकेकडे जमा होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. ही रक्कम जाते कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियंत्रण कोणाचे ?
मागील ६ महिन्यांच्या काळात मशीनमध्ये जमा होणाºया पैशांचा हिशोब पाहता ही रक्कम ५ ते ६ लाख रुपये इतकी होते. ही रक्कम जमा करण्यापासून तिचा हिशेब ठेवण्याचे काम महापालिकेकडून होणे अपेक्षित होते. मात्र यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने या रकमेचा वापर करून भलतेच आपले उखळ पांढरे करून घेत असल्याची चर्चा आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाची
याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता दत्तात्रय तांबारे म्हणाले, पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट गावांचे दफतर जमा करून त्या गावांमधील सर्व यंत्रणांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे, तसे आदेशच आयुक्तांनी काढले आहेत. त्यामुळे लोहगावमधील पाण्याच्या स्वयंचलित यंत्रामध्ये जमा होणाºया पैशांचा हिशोब नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाने ठेवणे अपेक्षित आहे. तर याबाबत नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त वसंत पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.