बारामतीत पाणीबाणी
By admin | Published: February 21, 2016 03:07 AM2016-02-21T03:07:27+5:302016-02-21T03:07:27+5:30
टँकरच्या पाण्यासाठी रस्त्या-रस्त्यावर मांडलेले बॅरल... टँकरची प्रतीक्षा करणारे आबालवृृद्ध, तर सायकलला कॅन अडकवून दाहीदिशा फिरणारे तरुण... हे चित्र मराठवाडा किंवा विदर्भातील
बारामती : टँकरच्या पाण्यासाठी रस्त्या-रस्त्यावर मांडलेले बॅरल... टँकरची प्रतीक्षा करणारे आबालवृृद्ध, तर सायकलला कॅन अडकवून दाहीदिशा फिरणारे तरुण... हे चित्र मराठवाडा किंवा विदर्भातील नसून, बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील आहे. या भागात जणू काही पाणीबाणीच लागू झाली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सलग ४ वर्षांपासून हा भाग भयानक दुष्काळाच्या झळा सहन करीत आहे. मागील वर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे येथील खरीप तसेच रब्बी हंगाम पूर्णत: वाया गेले. मागील वर्षी याच महिन्यात जिरायती भागात २ टँकर सुरू होते. तर, या वर्षी तब्बल १८ टँकर सुरू आहेत. टँकरच्या या संख्येवरूनच जिरायती भागातील पाणीटंचाईचे गांभीर्य स्पष्ट होते. विहिरी, पाझर तलाव, विंधन विहिरी, हातपंप, पूर्णत: कोरडे पडले आहेत. ज्या विहिरींना पाणी आहे ते क्षारयुक्त असल्याने पिण्यास योग्य नाही.
सध्या या भागात १८ टँकरद्वारे रोज ६४ खेपा होत आहेत. १७ गावे व १०८ वाड्या-वस्त्यांवरील ३८ हजार ५७२ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या मोराळवाडी, वाकी, कटफळ, गोजुबावी, निंबोडी, उंडवडी कडेपठार, उंडवडी सुपे, जराडवाडी, साबळेवाडी, सोनवडी, खराडेवाडी, कारखेल, देऊळगाव, नारोळी, कोळोली, दंडवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी शेरेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी या गावांसह परिसरातील १०८ वाड्यावस्त्यांवर टँकर सुरू आहे. तर भिलारवाडी, सायंबाचीवाडी, तरडोली, लोणी भापकर, मुढाळे, काऱ्हाटी वाड्यावस्त्या, गाडीखेल, मासाळवाडी, वढाणे वाड्यावस्त्या या गावांमध्ये टँकरची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी प्रस्तावित असल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
२०११-१२ पासून चारा छावण्यांपासून येथील वीज देयक थकीत आहे. सध्या ही रक्कम १६ ते १७ लाख रुपये आहे. पुरंदर आणि जनाई-शिरसाईच्या वीज देयकाची रक्कम टंचाईतून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, शासनाने हा प्रस्ताव अमान्य केला. त्यामुळे वीजबिल भरल्यानंतर पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा होईल.
- व्ही. एन. लोंढे, कार्यकारी अभियंता, चासकमान