बंधाऱ्यांतून पाणी वाहून जातेय
By admin | Published: May 12, 2017 04:50 AM2017-05-12T04:50:31+5:302017-05-12T04:50:31+5:30
तालुक्यातील नीरा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या दगडी बंधाऱ्यांपैकी सर्वच बंधाऱ्यांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : तालुक्यातील नीरा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या दगडी बंधाऱ्यांपैकी सर्वच बंधाऱ्यांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने दगड, सिमेंट निघाले असून, मोठमोठी भगदाडे पडल्याने गळती लागल्याने पाणी वाहून जात आहे. कोणत्याच बंधाऱ्यात पाणीसाठा होत नाही; त्यामुळे शेतीच्या पाणी उपसायोजना, नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास भविष्यात शेतीबरोबरच नळपाणी पुरवठा योजना अडचणीत येतील. मात्र, पाटबंधारे विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी नीरा नदीवर निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, शिंद, वेनवडी, येवली, वडगावडाळ या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक बंधाऱ्यांचे सिमेंट, दगड निघाले आहेत. मोठमोठी भगदाडे पडली आहेत. मोऱ्या वाहून गेल्या असून अनेक ठिकाणचा स्लॅप पडला आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरून अलीकडे-पलीकडे जाता येत नाही. बंधाऱ्याच्या पायातून पाणी खाली वाहून जात आहे. अनेक वर्षे बंधाऱ्यांना गळती लागली आहे. त्यामुळे या दगडी बंधाऱ्यात पाणीसाठाच होत नाही.
लाखो रुपये खर्च करून नीरा नदीवर ८ बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, निकृष्ट कामामुळे काही बंधारे वगळता इतर बांधाऱ्यांत पाणीसाठा होत नाही.
शेतीला व पाण्याच्या विहिरींना या पाण्याचा उपयोग होत नाही. अशीच स्थिती कायम राहिल्यास भविष्यात नीरा नदीवरील बंधाऱ्यांच्या पाण्यावर आवलंबून असलेल्या साळव रायरी, कंकवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, वाठार हि.मा., पोम्बर्डी, शिंद, वेनवडी या गावांच्या नळपाणी पुरवठा योजना धोक्यात
येऊ शकतात. त्यामुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.