भादलवाडी तलावात आले पाणी!
By admin | Published: November 17, 2014 05:19 AM2014-11-17T05:19:31+5:302014-11-17T05:19:31+5:30
भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलावामध्ये शनिवार (दि. १५) पासून खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे
पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलावामध्ये शनिवार (दि. १५) पासून खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दिवसांत तलावावर येणाऱ्या ‘चित्रबलाक’ पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाला त्याचा फायदा होणार आहे, असा आशावाद पक्षिप्रेमींनी व्यक्त केला.
‘लोकमत’ने याबाबत शुक्रवारी (दि.७) वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत असणारी बाभळीची झाडे पाणी नसल्यामुळे (पाणीपातळी कमी झाल्यामुळे) उघडी पडली होती. या धर्तीवर तलावात पाणी येऊ लागल्याने पक्षिप्रेमी आनंदात आहेत.
भादलवाडी तलाव चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगगार आहे. दरवर्षी हजारो पक्षी या ठिकाणी विणीच्या हंगामासाठी येतात. परंतु विणीचा हंगाम यशस्वी होण्यासाठी तलावामध्ये भरपूर पाणी असणे गरजेचे असते. पाणी असल्यास चित्रबलाक पक्ष्यांबरोबर विविध ५६ जातींच्या पक्ष्यांना वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होत नाही. मात्र मागील पंधरा दिवसांपूर्वी तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने पक्ष्यांचे आगमन होण्यापूर्वीच ही झाडे उघडी पडली होती. ‘लोकमत’ने याबाबत पाठपुरावा करून वृत्त प्रकाशित केले होेते. त्यानंतर जलसंपदा खात्याने या वृत्ताची दखल घेत शनिवार (दि. १५) सायंकाळपासून तलावात पाणी सोडण्यास सुरुवात केली. पाण्याचा विसर्ग वाढवून तलाव शंभर टक्के भरण्याची मागणी शेतकरी, पक्षिमित्र यांच्याकडून होत आहे. पाण्यामुळे पक्ष्यांसाठी मुबलक खाद्य व निवाऱ्याची सोय होणार आहे.