प्राणी, पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी बनवताहेत पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:11 AM2021-02-27T04:11:37+5:302021-02-27T04:11:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागत असून, अनेक ठिकाणी पाणवठे नसल्याने प्राणी, पक्ष्यांचे हाल होतात. त्यामुळे सध्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागत असून, अनेक ठिकाणी पाणवठे नसल्याने प्राणी, पक्ष्यांचे हाल होतात. त्यामुळे सध्या निसर्गप्रेमी माळरानांवर पाणवठे तयार करण्याचे काम सुरू करत आहेत. पुरंदर परिसरातील गावांमधील माळरानांवर शेकडो पाणवठे तयार केले जात आहेत. त्यामुळे प्राणी, पक्षी यांची तहान भागणार आहे.
काही वर्षांपासून निसर्गप्रेमी नागरिक, संस्था या प्रकारचे काम करीत आहे. गेल्या वर्षी खूप पाऊस झालेला असला, तरी माळरानांवर पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे तिथे कृत्रिमरीत्या पाणवठे तयार करावे लागतात. गतवर्षी पुरंदरमध्ये ५० च्या वर विविध ठिकाणी वन्यप्राणी यांच्यासाठी पाणी ठेवलेले होते. या वर्षी पुरंदरमध्ये किमान १०० पाणवठे केले जात आहेत. छोटे पाणवठे, प्लास्टिक कॅन, फुटलेले माठ, गॅलरीमध्ये पाण्याच्या बॉटल किंवा डिशमध्ये पाणी ठेवू या, असे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे.
सासवड, बेलसर, सिंगापूर, खळद, जेजुरी, कोळविहिरे, मोरगाव, पांडेश्वर, वाल्हे, नीरा, मांडकी,उदाची वाडी, भुलेश्वर, वागदरवाडी, नावळी, हरणी, पिंगोरी आदी भागांमध्ये वन्यप्राणी यांच्यासाठी विविध प्रकारचे पाणवठे तयार केले होते. यामध्ये प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक ड्रम, टायर यात प्लास्टिक कागद वापरून तसेच सिमेंट वाळूने तयार केलेले पाणवठे यांचा समावेश आहे. पिंगोरी येथील इला फाउंडेशन संस्थाही यासाठी काम करते. त्यांनी आवाहन केल्यावर गेले ३ वर्षे मार्च ते जूनपर्यंत पाणी टाकण्याचे काम केले जाते.
————————-
पाणी ठेवा अन् पक्ष्यांचे निरीक्षण करा
घराच्या जवळ, माळावर सावलीत, गॅलरीत, शेताच्या बांधावर, ओट्यावर, टेरेसवर सावलीत पाणी ठेवता येईल व वेगवेगळे कोणते पक्षी पाण्यावर आले? त्याची वेळ, स्थानिक की स्थलांतरित पक्षी याची नोंद करता येईल का? हाही आनंद या निमित्ताने नागरिकांना घेता येईल. त्यामुळे हा उपक्रम अधिकाधिक लोकांनी राबवावा, असे आवाहन निसर्गप्रेमी राजकुमार पवार यांनी केले आहे.
---------------