कालव्यातून पाण्याची राजरोस चोरी
By admin | Published: April 26, 2017 04:04 AM2017-04-26T04:04:11+5:302017-04-26T04:04:11+5:30
सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नवीन मुळा-मुठा कालव्यावरील पुलांना शहर व उपनगरांमध्ये दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणी भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणीगळती
फुरसुंगी : सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नवीन मुळा-मुठा कालव्यावरील पुलांना शहर व उपनगरांमध्ये दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणी भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होऊन दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. कालव्याच्या भरावाचीदेखील जागोजागी प्रचंड दुरवस्था होऊन पाणीगळती व पाणीचोरीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची नवीन मुळा-मुठा कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने दरदोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वरदहस्तामुळे व जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे कालव्यातून राजरोसपणे पाणीचोरी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी पुणे शहर व उपनगरांतून फुरसुंगी, लोणी काळभोर, यवत आदी परिसरातून जात असल्याने या भागातील लाखो नागरिकांना पिण्यासाठी व लाखो हेक्टर शेतीसाठी हा कालवा महत्त्वपूर्ण आहे. अशा वेळी कालव्याच्या भरावाची व पुलांची दुरवस्था झाल्याने या कालव्यातून बारमाही दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत असल्याने दर वर्षी शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर, ग्रामीण भागाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
कालव्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या व अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे सांडपाणी थेट कालव्यात जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रश्नी पाटबंधारे विभागाने कालव्यावरील पूल व भरावांची तत्काळ दुरुस्ती करून पाणीगळती थांबवावी व पाणीचोरी करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)