सासवडकरांवर ‘पाणीसंकट’
By admin | Published: February 27, 2016 04:30 AM2016-02-27T04:30:27+5:302016-02-27T04:30:27+5:30
गराडे व घोरवडी लघुपाटबंधारे तलावातून सासवड नगरपरिषदेला होत असलेला पाणीपुरवठा बंद करण्याचे पत्र पाटबंधारे विभागाने दिले आहे. त्यामुळे सासवडकरांसमोर ‘पाणीसंकट’
सासवड : गराडे व घोरवडी लघुपाटबंधारे तलावातून सासवड नगरपरिषदेला होत असलेला पाणीपुरवठा बंद करण्याचे पत्र पाटबंधारे विभागाने दिले आहे. त्यामुळे सासवडकरांसमोर ‘पाणीसंकट’ उभे राहिले आहे. यामुळे २०० टँकरने साधारण ५० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या जलाशयातील पाणी बंद झाल्यास वीर योजनेतून पाणीपुरवठा करावा लागला तर
सध्याच्या नियोजनाप्रमाणे सासवड शहराला पाणीपुरवठा करण्यास अडचणी येतील, असे जगताप यांनी सांगितले.
तहसीलदार पुरंदर यांच्या कार्यालयात नुकतीच पाणीटंचाई बैठक झाली होती. त्यानुसार गराडे लघुपाटबंधारे विभागाच्या शाखाधिकाऱ्यांनी सासवड नगरपरिषदेला या दोन्ही जलाशयांतून पाणी वापर बंद करावा, असे पत्र दिले होते.
दरम्यान, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांसह नगरसेवक अजित जगताप, मनोहर जगताप, कैलास जगताप, पाणीपुरवठाप्रमुख ज्ञानेश्वर गिरमे व सागर भुतकर यांनी गराडे जलाशयाला भेट देऊन पाणीपातळीची पाहणी केली. सासवडला दररोज ५० लाख लिटर पाण्याची गरज असून, गराडे ३० लाख लिटर, घोरवडी आणि वीरमधून प्रत्येकी १० लाख लिटर पाणी घेतले जाते. या नियोजनामुळे गराडे व घोरवडीतील पाणी एप्रिलअखेरपर्यंत पुरणार असल्याचे ज्ञानेश्वर गिरमे यांनी सांगितले. (वार्ताहर)
गराडेत २७, तर घोरवडीत २० एमसीएफटी पाणी
सध्या गराडेत २७ एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सासवड नगरपरिषद दिवसाआड व मीटर पद्धतीने पाण्याचे नियोजन करून पाणीपुरवठा करीत आहे. कोडीतच्या पाणी योजनेची विहीर जलाशयाच्या खालच्या बाजूला आहे. तर घोरवडीमध्ये २० एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक असून, यातून असणाऱ्या दिवे, सुपे व पिंपळे पाणी योजनांना जून २०१६ पर्यंत केवळ ५ एमसीएफटी पाण्याची आवश्यकता आहे. सासवड नगरपरिषदेने घोरवडी जलाशयातील पिण्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाने केलेल्या पाणी बिल मागणीप्रमाणे माहे जून २०१६ पर्यंतचे पाणीबिल भरलेले आहे. असे असतानाही पाणीपुरवठा बंद करावा, असे पत्र नगरपरिषदेस दिले आहे.