बारामतीच्या पश्चिम भागात पाणीसंकट

By admin | Published: May 12, 2017 04:55 AM2017-05-12T04:55:43+5:302017-05-12T04:55:43+5:30

बारामतीचा पश्चिम पट्टा हा जिरायती भाग म्हणून ओळखला जातो. यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे येथील गावे तहानलेलीच आहेत.

Water conservation in western part of Baramati | बारामतीच्या पश्चिम भागात पाणीसंकट

बारामतीच्या पश्चिम भागात पाणीसंकट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सुपे : बारामतीचा पश्चिम पट्टा हा जिरायती भाग म्हणून ओळखला जातो. यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे येथील गावे तहानलेलीच आहेत. याठिकाणी दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवलेले असते. त्यामुळे या परिसरात सुपे प्रादेशिक योजना राबवून सुपे गणात येणाऱ्या गावांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत माणसांबरोबर पशुधन जगवणे जिकिरीचे झाले आहे.
गेली तीन वर्षांपासून या पट्ट्यातील गावांमध्ये खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. गेल्या वर्षी शासनाने तालुक्यातील काही गावे ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी असल्याने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. मात्र शासनाचा या गावांना अद्याप कुठलाच निधी प्राप्त झालेला नाही. अशा या परिस्थितीत येथील नागरिक दुष्काळाशी सामना करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
येथील शेतकऱ्यांची वीजबिल माफ केलेले नाही. त्यामुळे कृषिपंप न चालवता २५ ते ३० हजार रुपये वीज बिल आले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सुप्यासह बोरकरवाडी, कुतवळवाडी, चांदगुडेवाडी, वढाणे, भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी, दंडवाडी, नारोळी, कोळोली आणि काऱ्हाटी आदी गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यातील काही गावांना मोरगाव प्रादेशिकचे पाणी चालू आहे. मात्र नाझरे धरणात नसल्यास त्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सुपे गावठाण तलावात वरवंड तलावातून पाणी आणून सुपे प्रादेशिक योजना करण्यात यावी. त्यामुळे येथील गावांचा कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. यापूर्वीच सन २०१४ साली ग्रामविकास मंत्रालयाकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या मालन चांदगुडे यांनी दिली.
सद्यस्थितीत पानसरेवाडी अंतर्गत असणाऱ्या कुदळेमळ्यातील नळपाणी पुरवठ्याची शासकीय विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे कुदळेमळा, तांबेवस्ती, गदादे वस्ती, घोडमळा आणि बोबडेमळा आदी ठिकाणचा नळपाणी पुरवठा योजना गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झाला आहे, अशी माहिती यादव कुदळे यांनी दिली.

Web Title: Water conservation in western part of Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.