‘रोडवेज‘च्या खडी प्लांटमुळे पाणी दूषित
By admin | Published: January 10, 2017 02:30 AM2017-01-10T02:30:41+5:302017-01-10T02:30:41+5:30
रोडवेज कंपनीच्या सुरू असलेल्या खडी प्लांटमुळे या परिसरातील शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.
भोर : रोडवेज कंपनीच्या सुरू असलेल्या खडी प्लांटमुळे या परिसरातील शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. याबरोबरच येथील पाण्याचे स्रोत खराब होत आहेत. या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरळ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केळवडे ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील चेलाडीजवळ केळवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रोडवेज कंपनीचा खडी प्लांट आहे. या खडीच्या धुरळ्यामुळे शेजारच्या शेतातील पिके खराब होतात. खडीमुळे आरोग्यास धोका निर्माण होत असून पिण्याचे पाणी खराब होते. यामुळे ग्रामपंचायतीने रोडवेज कंपनीला खडी प्लांट बंद करावा, असे पत्र दिले होते. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे तहसीलदारांना शेतकरी व ग्रामपंचायतीने हा प्रकल्प बंद व्हावा, यासाठी निवेदन दिले होते. त्यानुसार तहसीलदार यांनी रोडवेज कंपनीला हा प्लांट बंद करण्याचे आदेश दिले; मात्र तरीही कंपनीने तो बंद केला नाही. हा प्रकल्प जबरदस्तीने सुरू ठेवला असून शेतकऱ्यांना धमकावले जात असल्याचे केळवडे गावचे सरपंच शांताराम जायगुडे यांनी सांगितले. दरम्यान, रोडवेज कंपनीने तहसीलदारांचे आदेशाचे पालन न केल्याने केळवडे गावातील शेतकऱ्यांनी कंपनीच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कंपनी बंद करण्याची मागणी राजगड पोलीस ठाण्याकडे सह्यांचे निवेदन देऊन केली आहे. (वार्ताहर)