पाणीगळतीचा शाळेला धोका
By admin | Published: February 21, 2017 02:07 AM2017-02-21T02:07:23+5:302017-02-21T02:07:23+5:30
कुंजीरवाडी येथून जाणाऱ्या बेबी कालव्यातून होणाऱ्या घाण पाणीगळतीने येथील जिल्हा परिषद शाळेसह परिसरातील घरांना
उरुळी कांचन : कुंजीरवाडी येथून जाणाऱ्या बेबी कालव्यातून होणाऱ्या घाण पाणीगळतीने येथील जिल्हा परिषद शाळेसह परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणच्या कालव्यामध्ये सिमेंटचे अस्तरीकरण वा पाणी गळती थांबवणारी दुरुस्ती अद्याप पाटबंधारे विभागाने केली नसल्याची माहिती सरपंच अनुराधा कुंजीर व तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष कुंजीर यांनी दिली.
कुंजीरवाडी गावच्या हद्दीमध्ये बेबी कालव्यातून झिरपणाऱ्या (नळासारख्या वाहणाऱ्या) पाण्यामुळे कालव्याच्या परिसरातील जिल्हा परिषद शाळा व ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाच्या मैदानावर साठलेल्या दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. तसेच झिरपणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील घराच्या भिंती कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रवाहाला अडथळा
१ बेबी कालव्यावर उभारण्यात आलेले कमी उंचीचे पूल, पुलासाठी वापरलेल्या कमी व्यासाच्या नळ्या व कालव्यात वारंवार वाढणारी जलपर्णी यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे.
२ कालव्याच्या भरावातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे कालव्याचा भराव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
३ अशा वेळी लोकवस्तीच्या ठिकाणी फुटून जीवित व वित्तहानी होण्याची वाट पाटबंधारे विभाग पाहत आहे काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.
सततची होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील उपाय न करता लोकवस्तीच्या ठिकाणी कालव्याच्या अस्तरीकराणाची मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली.
बेबी कालव्यातून होणाऱ्या पाणीगळतीची मी स्वत: पाहणी केली आहे. त्यासंदर्भातील उपाययोजना सुरू केल्या आहेत. ग्रामपंचायत कुंजीरवाडी यांच्या मदतीने पाटबंधारे विभागाच्या यंत्रणाचे काम सुरू आहे. कालव्यातील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी कालव्यात पाणी सोडणाऱ्या पंपांची चालू असलेली संख्या कमी केली आहे. कालव्यावर कायमस्वरूपी पुलाची उभारणी करण्यासाठीचे अंदाजपत्रक काढून त्यासंदर्भातील निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन महिन्यांमध्ये नवीन पुलाची कामे सुरू होतील.
- बी. डी. थोरात, उपविभागीय अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग