कुकडी प्रकल्पातील पाणी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 02:51 AM2018-12-14T02:51:20+5:302018-12-14T02:53:09+5:30

धरणांनी गाठला तळ, प्रकल्पात केवळ ४० टक्के पाणी शिल्लक

The water in the cucumber plant | कुकडी प्रकल्पातील पाणी पेटणार

कुकडी प्रकल्पातील पाणी पेटणार

Next

- लक्ष्मण शेरकर 

ओझर : कुकडी प्रकल्पातून रब्बीच्या आवर्तनासाठी २५ आॅक्टोबरपासून आवर्तन सुरू आहे. ४९ दिवस झाले, तरी अजून ते बंद न झाल्यामुळे कुकडी प्रकल्पातील पाणीपातळी वेगाने घटत आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व चार धरणांत फक्त ४.७५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणात सर्वाधिक ७.५१९ टीएमसी पाणी शिल्लक असल्यामुळे येत्या काळात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुकडीचे पाणी पेटणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील शेतकरी व पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, शिरूर व करमाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये कुकडीचे पाणी सोडण्यावरून संघर्ष पेटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पहिलेच रब्बीचे आवर्तन एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कालवा सल्लागार समितीत झालेल्या नियोजनापेक्षा अतिरिक्त पाणी नगर जिल्ह्याला दिले जात असल्याने जुन्नर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे डोळ्यादेखत धरणे रिकामी होत असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कुकडी प्रकल्पात एडगाव, मणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, डिंभे ही धरणे येतात. कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता के. आर. कानडे व शाखाधिकारी जयसिंग घळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार कुकडी प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ३७.२५६ टीएमसी आहे, तर उपयुक्त पाणीसाठा ३०.५३६ टीएमसी आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे या प्रकल्पात २५.६८५ टीएमसी म्हणजेचे ८४.३१ टक्के पाणीसाठा १५ आॅक्टोबरपर्यंत झाला होता. एडगाव धरणात २.१३७ टीएमसी पाणी साठले होते. माणिकडोह धरणात ७.६२९ टीएमसी म्हणजेच, ७४.९७ टक्के पाणी साठले होते. वडज १.०७६ टीएमसी (९२ टक्के), पिंपळगाव जोगा २.२५६ टीएमसी (६५.७० टक्के) व डिंभे धरणात १२.२२८ टीएमसी (९८.३४ टक्के) पाणीसाठा होता. कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार रब्बीसाठी आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन आजही सुरूच आहे. आतापर्यंत कुकडी डाव्या कालव्याद्वारे ५.८८८ टीएमसी, डिंभे उजवा कालवा ०.८३१ टीएमसी व पिंपळगाव जोगा डावा कालव्यातून ०.८६७ टीएमसी पाणी सोडले गेले. हे आवर्तन आजही सुरूच आहे. वडज व डिंभे धरणातून एडगाव धरणात पाणी सोडले जात आहे. यामुळे आज एडगाव धरणात ०.७५३ टीएमसी (३०.७५ टक्के), माणिकडोह धरणात १.९४३ टीएमसी (१९.०९टक्के) पाणी शिल्लक आहे. तर वडज धरणात ०.५६६ टीएमसी (४८.३६ टक्के), पिंपळगाव जोगे धरणात १.४८९ टीएमसी (३८.२८ टक्के) आणि डिंभे धरणात ७.५१९ टी एम सी (६०.१८ टक्के)पाणी शिल्लक राहिले आहे.
संपूर्ण प्रकल्पात निम्म्यापेक्षाही कमी म्हणजेच १२.२७१ टी एम सी (४०.१८ टक्के) पाणी आज शिल्लक आहे. या पाण्यावर किमान पुढील सहा महिने काढावे लागणार आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व चार धरणांत फक्त ४.७५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणात सर्वाधिक ७.५१९ टीएमसी इतका भरीव पाणीसाठा शिल्लक आहे.

पाण्याची स्थिती पाहता जुन्नर तालुक्यातील सर्वच राजकीय नेते नगर व सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हितसंबंधामुळे पाणीप्रश्नावर ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. या मंडळीची उदासीनता पाहता शेतकरीवर्गाला भविष्यात पाण्यासाठी स्वत:च संघर्ष करण्याची तयारी करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे, आवर्तन कायम राहिले तर तालुक्याला शेतीबरोबर पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुकडीच्या पाण्याचे जे नियोजन होणे अपेक्षित होते, ते झाले नसल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी पाण्याचे नियोजन केलेले नाही. कालवा सल्लागार समितीच्या पाणी वाटप बैठकीला लोकप्रतिनिधी हजर नसल्यामुळे हे पाणी पळविले जात आहे व जे पाणी खाली सोडले आहे- खालील लोकांनी ओढे भरून पाण्याचा दुरुपयोग केला आहे.
-अतुल बेनके, राष्ट्रवादी काँगे्रस, माजी युवा प्रदेश उपाध्यक्ष

कुकडी प्रकल्पातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यांसाठी पाणी सोडले असले, तरी दुष्काळाची पार्श्वभूमी पाहता जुन्नर तालुक्यातील शेतकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही याचे नियोजन केले आहे. माणिकडोह धरणात जवळपास दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे ते पाणी जुन्नर शहराला पिण्यासाठी, तालुक्यासाठी शेतकरीवर्गासाठी राहणार आहे. पिंपळगाव धरणातील पाणीसाठा व साडेचार टीएमसी मृतसाठा हा जुन्नर तालुक्यातील व पारनेर तालुक्यातील शेतकरी यांना त्याचा उपयोग होईल. डिंभेमधील पाणी कालव्याद्वारे एडगाव धरणात सोडले जाणार आहे. कुकडी प्रकल्पातून दुसरे उन्हाळी आवर्तन चांगले होऊनदेखील तालुक्यातील शेतकºयांना जून पर्र्यंत गरजेपेक्षा अधिक पाणी शिल्लक ठेवण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीत
ठरले आहे.
- शरद सोनवणे, आमदार

पारनेर, श्रीगोंदा, कर्जत; तसेच करमाळा तालुक्यातील शेतकºयांच्या हिताचा विचार करून कुकडीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे, तो यशस्वी होऊ देणार नाही. वेळप्रसंगी जुन्नर तालुक्यातील शेतकºयांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, तर मागे-पुढे पाहणार नाही.
- आशा बुचके, शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या 

तालुक्यातील सर्व धरणांतील खालावणारी पाणीपातळी पाहता शेतकºयांच्या दृष्टीने पुढील सहा महिन्यांचा काळ हा शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी खडतर असणार आहे. यापुढे सर्व धरणांतील पाणी हे तालुक्यातील शेतकºयांसाठी राखीव ठेवले पाहिजे, सध्या पाणी हे शेतकºयांच्या आर्थिक हिताशी निगडित असून पाणीप्रश्नावर विघ्नहर कारखाना शेतकºयांच्या मागे खंबीर उभा असून वेळप्रसंगी प्रत्येक धरणावर जाऊन गेट बंद आंदोलन करू, परंतु पाणी खाली सोडू दिले जाणार नाही.
- सत्यशील शेरकर,
अध्यक्ष, विघ्नहर साखर कारखाना

Web Title: The water in the cucumber plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.