पुण्यात पाणी कपात सुरुच; दोनच पंप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:44 AM2018-10-13T03:44:35+5:302018-10-13T03:45:01+5:30
पुण्याच्या पाणीकपातीवर गदारोळ होऊन मंत्र्यांपर्यंत तक्रार गेल्यानंतरही पाटबंधारे विभागाने एक पंप बंदच ठेवला आहे.
पुणे : पुण्याच्या पाणीकपातीवर गदारोळ होऊन मंत्र्यांपर्यंत तक्रार गेल्यानंतरही पाटबंधारे विभागाने एक पंप बंदच ठेवला आहे. त्यामुळे लष्कर भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी ४०० एमएलडी पाण्याची गरज असताना केवळ २५० एमएलडीच पाणी उचलता आले. त्यामुळे शुक्रवारी पूर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. शनिवारीही कमी पाणी मिळणार आहे.
कालवा समितीच्या बैठकीनंतरदेखील महापालिका मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने महापालिकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता बुधवारी दुपारी चार वाजता तीनपैकी दोन पंपिंग पंप बंद करून केवळ एकच पंप सुरू ठेवला. यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी विस्कळीत झाला. याबाबत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने नियमित पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले. परंतु एकूण तीनपैकी केवळ दोन पंप सुरू केले. अद्यापही एक पंप बंद असल्यामुळे पाणीकपात सुरूच आहे. यामुळे शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीत आहे. न्यू कोपरे कोढी येथील नवीन पंपिंग स्टेशन महापालिकेने आधुनिक यंत्र बसविले आहे. येथे एकूण ८ पंपिंग पंप बसविले आहेत. यापैकी सध्या तीन पंपिंग पंप नियमित सुरू असतात. यात एक पंप १२५ एमएलडी पाणी उचलतो.
केवळ दोन पंप सुरू असल्यामुळे २५० एमएलडी पाण्याचा लष्कर जलकेंद्राला पुरवठा होत आहे. प्रत्यक्षात लष्कर जलकेंद्र पूर्ण
क्षमतेने सुरू राहण्यासाठी चारशे एमएलडी पाण्याची गरज असते. एक पंप बंद असल्यामुळे शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीत आहे.
पालकमंत्र्यांकडून कपातीचा निर्णय नाही
शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांमध्ये सध्या २७ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही पुण्याच्या पाणीपुरवठ्यात रोज तब्बल २०० एमएलडीने कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणीकपातीचा कुठल्याही निर्णय घेतला नसून, सर्वांना समान पाणीपुरवठा करण्याचा निश्चित करण्यात आले आहे. असे असताना महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून दोन पंप बंद केले होते. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती.
त्यावर यापुढे १३५० एमएलडी पाणी शहराला देण्याच्या सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचे पंप सुरू झाल्याचे टिळक यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्यानंतर महापालिकेचा बंद केलेल्या दोनपैकी केवळ एकच पंप सुरू करण्यात आला आहे.