Pune | पुणेकरांवरील पाणी कपात तूर्तास टळली; नवीन नळजोड देणे बंद
By निलेश राऊत | Published: April 18, 2023 06:57 PM2023-04-18T18:57:41+5:302023-04-18T18:58:09+5:30
खडकवासला धरण साखळीत आजमितीला १२ टीएमसी पाणीसाठा आहे...
पुणे : जलसंपदा विभाग व महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारची पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी कपात तूर्तास टळली असली तरी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपातीसंदर्भात निर्णय हाेण्याची शक्यता आहे.
खडकवासला धरण साखळीत आजमितीला १२ टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणांमधून शेतीकरीता उन्हाळी आवर्तन देण्यासाठी साधारणत: ५ टीएमसी पाण्याची गरज असून, पुणे शहराची तहान भागविण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाइी साधारणत: ७ टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. दरम्यान उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात हाेत असल्याने अंदाजे दोन टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा वापर जपून करावा. अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्या आहेत. अशी माहीती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जलवाहिनी दुरूस्तीचे काम ऑक्टोबर महिन्यानंतर
खडकवासला ते पर्वती जलकेंद्र पर्यंत महापालिकेच्यावतीने २५ वर्षांपूर्वी बारा किलोमीटर अंतराची बंद जलवाहिनी टाकण्यात आली होती. या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गंज चढला असून, तीची काही ठिकाणी दुरूस्तीही करणे जरूरी आहे. याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली परंतु, या निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या जलवाहीनीचे काम सुरु केल्यानंतर महापालिकेला कालव्यातून प्रति दिन तीन हजार एमएलडी इतके पाणी उचलावे लागणार आहे. आजमितीला कालव्यातून पाणी साेडण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतल्यावर परीणाम होऊ शकतो. त्यामुळे या जलवाहीनीच्या दुरुस्ती, रंगरंगाेटीचे काम हे ऑक्टोबर महीन्यानंतर करण्यात यावे, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केल्या आहेत.
नवीन नळजोड देणे बंद
पाण्याची उपलब्धता व वाढते ऊण लक्षात घेता, पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी बांधकाम, वाहने धुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. बांधकामासाठी व वॉशिंग सेंटरवर पिण्याचा पाण्याचा वापर करण्याऐवजी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांचे नळजोड कापले जाणार आहेत. दरम्यान उन्हाळ्याच्या पुढील दीड महिन्याच्या काळात नवे नळजोड दिले जाणार नसल्याचे अनिरूध्द पावसकर यांनी सांगितले आहे.