पुणे शहरातील पाणी कपात तुर्तास टळली; धरणाच्या पाणीसाठयात वाढ
By राजू हिंगे | Published: July 1, 2024 08:24 PM2024-07-01T20:24:49+5:302024-07-01T20:25:15+5:30
गेल्या सहा दिवसांपासून खडकवासला धरण शेताच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालीये
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात ४.२४ टिएमसी पाणी साठा झाला आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये पाऊण टीएमसी पाणी वाढले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे शहरातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणा०या खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर, आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणी साठा कमी होउन ३.५० टिएमसी झाला होता. मात्र गेल्या सहा दिवसांपासून खडकवासला धरण शेताच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. नदी, ओढ्यांमधून धरणात पाणी जात असल्याने जलसाठ्यात पाऊण टीएमसी वाढ झाली आहे. आता खडकवासला प्रकल्पात एकुण ४.२४ टिएमसी पाणीसाठा झाला आहे. पालखीसाठी कालव्यातुन ५०० क्युसेक्स पाणी साेडले आहे. पुणे महापालिका धरणातुन रोज १ हजार ७०० क्युसेक्स पाणी उचलत आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठयामध्ये पाउन टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी कपात केली जाणार नाही. - नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग