जलवाहिनी फुटल्याने परिसर जलमय
By admin | Published: May 31, 2017 02:44 AM2017-05-31T02:44:25+5:302017-05-31T02:44:25+5:30
राजीव गांधी पंपिंग स्टेशनवरून-कात्रज भागातील केदारेश्वर टाकीकडे जाणारी पिण्याच्या पाण्याची लाईन कात्रजच्या उड्डाणपुलाखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
कात्रज : राजीव गांधी पंपिंग स्टेशनवरून-कात्रज भागातील केदारेश्वर टाकीकडे जाणारी पिण्याच्या पाण्याची लाईन कात्रजच्या उड्डाणपुलाखाली प्राणीसंग्रहालयाच्या सीमा भिंतीशेजारी फुटल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सुमारे २ तास येथील वाहतूक विस्कळीत झाली होती.
राजीव गांधी पंपिंग स्टेशनवरून-कात्रज भागातील केदारेश्वर टाकीकडे जाण्यासाठी १२८९ एमएम व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. ही पाइपलाइन प्रेशरमुळे फुटल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. सकाळी १०.१५ च्या सुमारास ही पाइपलाइन फुटली. सकाळी ११.३० पर्यंत जलविभागाचा एकही अधिकारी किंवा पोलीस घटनास्थळी आले नव्हते.
या ठिकाणी अनेक गाड्या पाण्याखाली आल्या होत्या. पाण्याचा प्रवाह अतिशय वेगात असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू केली. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली होती. नगरसेवक वसंत मोरे, युवराज बेलदरे, नमेश बाबर, महेश कदम, सागर बाबर यांनी घटनास्थळाला तातडीने भेट देऊन अधिकाऱ्यांना घटनास्थळी येऊन पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या.
याविषयी स्वारगेट जलकेंद्राचे कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांनी सांगितले, की रायझिंग लेन असल्यामुळे प्रेशर या ठिकाणी निर्माण होत असते. ज्या ठिकाणी पाइपलाइन फुटली त्या ठिकाणी खड्डा होता. दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले आहे.
२०११ पासून ही पाण्याची वाहिनी उड्डाणपुलाच्या बाजूने शिफ्ट करण्याची मागणी करीत आहोत. उड्डाणपुलाखालून ही लाईन गेल्यामुळेच ती फुटत आहे. आतापर्यंत या लाईनच्या दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चात ही लाईन शिफ्टदेखील झाली असती. पालिकेत यासंदर्भात पाठपुरावा करणार आहोत.
- वसंत मोरे, नगरसेवक
एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना अनेक वेळा या ठिकाणी ही लाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. आम्ही या ठिकाणी शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. यापुढे अशी घटना घडली तर जबाबदार अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
- महेश कदम, सामाजिक कार्यकर्ते
यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. येथील पाणी सोडण्यासाठी असलेले कर्मचारी हे प्रशिक्षित आहेत की नाही, याची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जलकेंद्र विभागाला लेखी निवेदन देऊन याची माहिती घेणार आहोत.
- नमेश बाबर, राष्ट्रवादी