महापालिकेने अवघ्या १७ दिवसांत केले महिन्याचे पाणी गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 12:10 PM2019-03-13T12:10:02+5:302019-03-13T12:11:31+5:30
गेल्या १७ दिवसांमध्ये खडकवासला धरण साखळीतील तब्बल १ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कमी झाले आहे.
पुणे : दुष्काळी स्थितीत काटकसरीने पाणी वापरणे आवश्यक असतानाही, गेल्या १७ दिवसांमध्ये खडकवासला धरण साखळीतील तब्बल १ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कमी झाले आहे. शहराला एक महिना पुरेल इतके हे पाणी आहे. यातील ०.९० टीएमसी पाण्याचा वापर महापालिकेने केला असेल, असे जलसंपदातील सूत्रांना सांगितले. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने १५ जुलैपर्यंत खडकवासला प्रकल्पातील पाणी पुरविण्याचे आव्हान आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ८९२ दश्लक्ष लिटर (एमएलडी) पाणी वापरण्याची संमती दिली होती. शहरात पाणी कपात करावी लागेल, या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. अखेरीस शहराला १३५० एमएलडी पाणी देण्याचे निश्चित झाले. त्यासाठी शेतीच्या सिंचनाचे आवर्तन रद्द करण्यात आले. मात्र, इतके होऊनही शहराचा पाणी वापर मात्र कमी होताना दिसत नाही. खडकवासला प्रकल्पात २४ फेब्रुवारी रोजी ११.९४ टीएमसी पाणीसाठा होता. त्यात १२ मार्च अखेरीस १०.९३ टीएमसी पर्यंत घट झाली आहे.
दुरुस्तीच्या कारणास्तव टेमघर धरणातील पाणीसाठी ०.०१ टीएमसी पर्यंत खाली आणण्यात आला आहे. तर, वरसगाव धरणात ४.९६, पानशेत ४.७० आणि खडकवासला धरणात १.२७ टीएमसी असा १०.९३ टीएमसी पाणीसाठा आहे. शहरासह स्वतंत्र पाणी घेणाºया काही मोठ्या गृहनिर्माण संस्था, शहरालगतची गावे यांना देखील पाणी पुरवठा करावा लागतो. या स्थितीत पाणी काटकसरीने वापरावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी याच काळात चारही धरणात मिळून १५.२७ टीएमसी पाणीसाठा होता.
---------------------
कालवा समितीची बैठक घेणार कार्यकारी संचालक
आचारसंहिता लागू झाल्याने आगामी कालवा समितीची बैठक कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खालिद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली होईल, अशी माहिती जलसंपदामधील सूत्रांनी दिली. बैठकीची तारीख अद्याप ठरली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सध्याचा पाणी वापर आणि उन्हाळ््यात होणारे बाष्पीभवन या मुळे शेतीला उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपादा विभागाने या पुर्वीच जाहीर केले आहे. महापालिकेच्या वाढत्या पाणी वापराबाबत जलसंपदा नक्की काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.