पाण्यासाठी दिघीकरांची भटकंती

By admin | Published: May 30, 2017 02:43 AM2017-05-30T02:43:26+5:302017-05-30T02:43:26+5:30

पालिकेच्या पाणी कपातीच्या निर्णयामुळे दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा

Water dragon | पाण्यासाठी दिघीकरांची भटकंती

पाण्यासाठी दिघीकरांची भटकंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दिघी : पालिकेच्या पाणी कपातीच्या निर्णयामुळे दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे जलसंकटात सापडलेल्या अनेक कुटुंबावर परिवारासह घरातील सर्व छोटी मोठी भांडी घेऊन पाण्याच्या शोधात दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ प्रशासनाने आणल्याचे वास्तव
आहे.
एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठ्याला दिघीकरांचा विरोध नसून पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर आक्षेप आहे. वारंवार तक्रारी, व त्या तक्रारींना अधिकाऱ्यांची मिळणारी उत्तरे यामुळे जनता जनार्दन हतबल झाली आहे. प्रशासन असो वा लोकप्रतिनिधी कुणालाही पर्वा नसली तरी पाण्यासाठी कंपनीला दांडी मारून परिवारासह पाण्याच्या शोधात फिरत असल्याचे भोसले यांनी सांगितले. परिसरातील छत्रपती संभाजीमहाराज चौकातील पोलीस चौकीत पाणी भरायला आलेल्या अनेक कुटुंबांनी प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. पोलीस चौकीसमोरील गायकवाड रेसिडेन्सी येथे अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र, पाणी कपात केल्यापासून पाण्याचा दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. तर कधी पिण्याच्या पाण्याची साठवण होत नसल्याच्या तक्रारींचा पाऊस महिलावर्गानी पाडला. पाण्याची निर्माण झालेली भीषण परिस्थिती, पाण्यासाठी लहान मुलांसह भटकंतीची वेळ, व पाण्यासाठी बुडालेला त्या दिवसाचा रोजगार यामुळे जगावे तरी कसे? असा गहन प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.
दिघी परिसरातील पोलीस चौकीतील नळ, मॅगझिन चौकातील पाण्याची टाकीचा नळ, देवस्थान मंदिरातील नळ, व शेजारधर्म म्हणून पाण्याची मदत करणाऱ्या घरासमोर भांड्याच्या रांगा लागल्या आहेत. लहान बाल वृद्धांपासून सर्व जण डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे घेऊन जातानाचे चित्र दिघी परिसरात पहावयास मिळत आहे.
रस्त्यावरील पाण्याचे व्हॉल्व्ह सुद्धा रिकामे नाहीत. जेथून पाणी उपलब्ध होईल, अशा ठिकाणी नागरिक पाण्यासाठी गर्दी करीत आहेत.
मॅगझिन चौकातील पाण्याच्या टाकीजवळील नळावर टेम्पोतून पाण्याची भांडी दाखल झाली. लांब पल्ल्यावर पाणी न्यावे लागते त्यामुळे परिसरातील दोन तीन कुटुंब
मिळून टेम्पोमध्ये भांडी भरून आणल्याचे चालकाने सांगितले. यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधी पाण्याच्या पुरवठ्याविषयीच्या करीत असलेल्या वल्गना फोल ठरली
आहेत.

पाण्यासाठी पोलीस स्टेशनच्या दारात

हुशार माणसाने पोलीस स्टेशनची व कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. परंतु पाण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणली आहे. या पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक गुन्हेगार येऊन हजेरी लावतात, तर कधी गुन्ह्याच्या तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. आम्ही असा कुठलाही गुन्हा नोंद करण्यासाठी नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढलो आहोत. गुन्हेगारांना शिक्षा व आमच्या कुटुंबांना पाणी देऊन जीवनदान देण्याचं काम पोलीस चौकीतून होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title: Water dragon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.