बंदोबस्तात शेतीसाठी पाणी

By admin | Published: March 29, 2016 03:32 AM2016-03-29T03:32:56+5:302016-03-29T03:32:56+5:30

भामा-आसखेड धरणातून दौंड व शिरूर तालुक्यांतील शेतीसाठी सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस

Water for farming | बंदोबस्तात शेतीसाठी पाणी

बंदोबस्तात शेतीसाठी पाणी

Next

पाईट : भामा-आसखेड धरणातून दौंड व शिरूर तालुक्यांतील शेतीसाठी सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिरूर तालुक्याचे आमदार बाबूराव पाचर्णे व दौंड तालुक्यातील किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी सोडण्याची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
यानुसार प्रशासनाने गोपनीयता राखत पाणी सोडण्यासाठी धरणावर पोलीस बंदोबस्त ठेवला. उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्यासह चाकण लोणीकंद, वडगाव मावळ, मंचर, खेडमधील सुमारे १२० पोलिसांचा मोठा बंदोबस्त या वेळी तैनात करण्यात आला. यामुळे धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
यानंतर भामा आसखेडचे सिंचन व्यवस्थापनचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी पुणे पाटबंधाारे अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळाच्या आदेशाने सोमवारी दुपारी ३ वाजता ९०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले. हे आवर्तन १५ दिवस सुरू राहणार असून सुमारे ०.८८ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
धरणावरील बंदोबस्त पाहून धरणग्रस्त धरणावर जमा झाले. मात्र धरणग्रस्त कमी व पोलीस जास्त अशी स्थिती होती. या वेळी धरणग्रस्तांनी निवेदन देत शासनाचा निषेध केला. दौंड व शिरूर तालुक्यातील शेती वाचविण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलण्यात येत असून या भागातील कोहिंडे, कोळीये, वेल्हावळे, साबळेवाडी, कान्हेवाडी, तेकवाडी, वाघू शिवे, पराळे, अनावळे, कासारी या गावांना टंचाईस सामोरे जावे लागणार आहे, असे भामा आसखेड कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे यांनी सांगितले.
या वेळी दत्ता रौधळ, दत्तात्रय आवारी, नामदेव साळुंके, शंकर शिवेकर, बबन कुटे, लक्ष्मण करंडे, संदीप कोळेकर यांनी हे धरणग्रस्तांवर अन्याय करणारे असल्याचे सांगितले.(वार्ताहर)

Web Title: Water for farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.