पाणीयुक्त पेट्रोलने गाड्या पडल्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:39+5:302021-06-02T04:09:39+5:30
सिंहगड रस्त्यावरचा प्रकार: पंपचालकाला तक्रार मान्य लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सिंहगड रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाणी मिसळले गेल्याने ...
सिंहगड रस्त्यावरचा प्रकार: पंपचालकाला तक्रार मान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: सिंहगड रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाणी मिसळले गेल्याने एकाच वेळी अनेक गाड्या बंद पडल्या. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार झाला.
पाऊस बंद झाल्यावर ज्यांनी पंपावर पेट्रोल भरले त्या सर्व गाड्या पुढे थोड्या अंतरावर गेल्या व बंद पडल्या. त्यामुळे सगळेच पंपावर परत आले. काहींनी गाडीच्या टाकीतून पेट्रोल काढून ते बाटलीत भरले व ती बाटली दाखवण्यासाठी आणले. त्यात निव्वळ पाणीच दिसत होते असे जनार्दन क्षीरसागर यांनी सांगितले.
पंप व्यवस्थापक शेखर यांनाही बराच वेळ काय झाले ते समजेना. दरम्यान वाहनधारकांचा संताप वाढत चालला. बाटलीत पाणीच दिसत असल्याचे शेखर यांनी मान्य केले. काही गाड्या त्यांनी स्वतः पाहिल्या. पंपामधील टाकीत पावसाचे पाणी शिरले असल्याचा अंदाज त्यांना आला.
पंपचालकांबरोबर बोलून शेखर यांनी सर्व गाड्या ठेवून घेतल्या. दुचाकी धारकांंना दुसऱ्या टाकीतील चांगले पेट्रोल दिले. चारचाकी गाड्यांमध्येही पेट्रोल भरून देण्याची तयारी दर्शवली, त्यामुळे कोणीही पोलीस तक्रार केली नाही अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली.