कोसभरावर पाणी; तरी घसा कोरडाच

By admin | Published: September 6, 2015 03:26 AM2015-09-06T03:26:57+5:302015-09-06T03:26:57+5:30

एका बाजूला वर्षातून बारा महिने ओसंडून वाहणारा नीरा डावा कालवा आणि दुसऱ्या बाजूला याच कालव्यापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर पाण्यासाठी टँकरची वाट पाहणारी कासावीस

Water; However, the throat is dry | कोसभरावर पाणी; तरी घसा कोरडाच

कोसभरावर पाणी; तरी घसा कोरडाच

Next

- सुनील राऊत, बारामती
एका बाजूला वर्षातून बारा महिने ओसंडून वाहणारा नीरा डावा कालवा आणि दुसऱ्या बाजूला याच कालव्यापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर पाण्यासाठी टँकरची वाट पाहणारी कासावीस माणसे, असे विदारक चित्र बारामती तालुक्याच्या पश्चिमेकडील २२ गावांमध्ये दुष्काळामुळे पुन्हा दिसू लागले आहे. विशेष म्हणजे ही सर्व गावे वर्षभर केवळ उसासाठी भरून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यापासून अवघ्या १० ते २० किलोमीटरच्या परिघात आहेत. मात्र, त्यांना या कालव्यातील एक थेंबही पाणी मिळत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
प्रत्येक लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही पाणी समस्या निवडून येताच तातडीने सोडविण्याची आश्वासने देण्यात आली. मात्र, या गावांच्या तीन पिढ्या घोटभर पाण्याची वाट पाहतच संपल्या. परिणामी हे ऊस जगविणारे पाणी, माणूस जगविण्यासाठी का नाही, असा जीवघेणा आक्रोश या भागातील नागरिक करीत आहेत.
बारामती तालुक्याच्या पश्चिम दिशेला असलेली ही गावे एकाच परिघात आहेत. त्यातील चार ते पाच गावेच कालव्यापासून १८ किलोमीटरवरच्या अंतरावर आहेत. या २२ गावांची लोकसंख्या जेमतेम ४० ते ४५ हजार असून प्रतिमाणशी प्रतिदिन ३०० लिटर पाणी त्यांना पिण्यासाठी दिल्यास दरदिवशी १२ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच वर्षभरासाठी ४३८ लिटर म्हणजेच अवघे ०.०१५ टीएमसी पाणी गावांची तहान भागवू शकते. विशेष म्हणजे, या गावांपासून १५ किलोमीटरच्या परिघातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यातून दरवर्षी तब्बल १४ टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले जाते; तर या पाण्याचे बाष्पीभवन आणि गळती सुमारे ३ ते ४ टीएमसी आहे. म्हणजे या गळतीच्या पाण्याचे प्रमाण पाहता नुसत्या गळतीचे पाणीही या गावांसाठी किमान २० वर्षे पुरेल एवढे आहे.

नीरा कालव्यातून पाणी का नाही ?
नीरा डावा कालवा हा ब्रिटिशकालीन आहे. वीर धरणातून या कालव्यासाठी पाणी सोडले जाते. या कालव्याच्या स्थापनेपासून हा कालवा शेतीसाठीच आहे. तर काही ठिकाणी या कालव्याच्या पाण्यावर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही सक्रिय आहे. ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी दिल्यास काही सिंचन क्षेत्र निश्चित कमी होणार आहे. मात्र, त्याचे प्रमाण ०.०१ टक्क्यापेक्षाही कमी असणार आहे; तर दुसरीकडे हे पाणी वितरिकेद्वारे दिल्यास त्याची चोरी होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्षात हे पाणी गावांना जॅकवेल अथवा कालव्यापासून ५ किलोमीटरच्या परिघात असलेल्या एखाद्या गावात साठवण तलाव करून त्यानंतर पुढे देणे सहज शक्य आहे.

हे शक्य असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारीही खासगीत बोलताना सांगतात. तसेच, हा तोडगा व्यवहार्य असल्याचेही कबूल करतात. त्यानुसार, जोगवडी हे गाव कालव्यापासून अवघे ४ किलोमीटर आहे. त्या ठिकाणी साठवण तलाव केल्यास आणि त्या ठिकाणच्या टेकडीवर टाकी बांधून या गावांसाठी पाणीपुरवठा केल्यास तो सहज शक्य असल्याचे अधिकारी मान्य करतात. याशिवाय पळशी येथेही मोठा तलाव असून त्या ठिकाणाहूनही पाणी या गावांना उपसा सिंचन योजना करून पुरविणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा मोठा प्रश्न आहे.

जवळच्या जलस्रोताचे काय ?
पुरंदर उपसा योजनेचे शेतीसाठी देण्यात येणार आहे. हे पाणी बारामती तालुक्यातील जोगवडी येथे आणून तेथून अन्य गावांना वितरित करण्याची योजना आहे. लोकसभा निवडणुकीत पाण्याचा राजकीय मुद्दा झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काही काही महिने अगोदर युद्धपातळीवर ६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पवारवाडीच्या तलावात गाजावाजा करीत पाणी सोडले. त्यानंतर या तलावात पाण्याचा थेंब आलेला नाही. जवळचे मार्ग सोडून अडचणीतून पुरंदर योजना कार्यान्वित केली. त्याचा फारसा उपयोग होत नाही. पाण्यासाठी मोरगाव प्रादेशिक योजनेवरदेखील कोट्यवधीचा खर्च होत असताना जवळील जलस्रोताचा विचार का होत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे़

त्या गावांना पाणी देणे शक्य नाही : शरद पवार
बारामती तालुक्यातील जिरायत भागामधील या २२ गावांतील गावकऱ्यांनी मागणी करुनही त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यास गेल्या अनेक वर्षांपासून शक्य झाले नाही़ येथील गावकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बारामती तालुक्यातील २२ गावांना पाणी देणे अजूनही शक्य झाले नसल्याचे विचारले असता ते म्हणाले, सगळीकडे पाणी जात नाही़ उंचावर असल्याने तेथे पाणी देणे शक्य होत नाही़ लिफ्टनेही मर्यादित पाणी जाते़ बारामतीतील या गावांसह अनेक ठिकाणी हा प्रश्न आहे़

नीरा नदीतून अब्जावधी लिटर पाणी वाया
यंदाचा अपवाद वगळता नीरा नदीत धरणात जास्त झालेले पाणी सोडून दिले जाते. हे पाणी अक्षरश: वाया जाते. जवळपास २ ते ३ वेळा धरणे भरतील इतके पाणी सोडून दिले जाते. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांबळेश्वरला छोटे धरण बांधण्याचे नियोजन होते.

पुढे तावशी (ता. इंदापूर) येथे नीरा नदीवरच असेच नियोजन होते. या छोट्या धरणात दोन ते तीन टीएमसी पाणी अडविण्याची क्षमता असेल, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात ही योजना अमलात आली नाही. नीरा नदीत धरणाचे सोडलेले जादा पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत वळवणे अथवा जिरायती भागात मोठा तलाव करून सोडणेदेखील शक्य आहे. नीरा नदीपासून जिरायती भागातील गाव २२ ते २३ किलोमीटर अंतरावर आहे.

Web Title: Water; However, the throat is dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.