पाषाण तलावावर जलपर्णीचे आच्छादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:54+5:302021-04-09T04:10:54+5:30
पुणे : गेल्या वर्षी पाषाण तलावावर काही लाख रुपये खर्च केल्यानंतर पुन्हा संपूर्ण तलावावर जलपर्णी पसरलेली आहे. त्यामुळे कुठेही ...
पुणे : गेल्या वर्षी पाषाण तलावावर काही लाख रुपये खर्च केल्यानंतर पुन्हा संपूर्ण तलावावर जलपर्णी पसरलेली आहे. त्यामुळे कुठेही तलावातील पाणी दिसून येत नाही. या जलपर्णीमुळे पक्षीही कमी झाले असून, डासांचे प्रमाण मात्र वाढले आहे. ही जलपर्णी काढून तलावाला मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
पाषाण तलाव अनेक वर्षांपासून पक्ष्यांचे नंदनवन बनलेले आहे. पण आता येथे पक्षीच पाहायला मिळत नाहीत. कारण तलाव आता कचऱ्याचा डेपो झाल्यासारखा बनला आहे. तिथे कचरा टाकला जात असून, सर्वत्र घाण पसरलेली आहे. महापालिकेकडून स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात नाहीत. काही वर्षांपूर्वी या तलावातील जलपर्णी काढण्यासाठी एक बोट ठेवली होती. त्या बोटने काम केले जात होते. परंतु, आता ही बोटदेखील गायब झाली आहे. त्यामुळे संपूर्ण तलावच जलपर्णीमय झाला आहे.
या तलावामुळे परिसरातील विहिरींना, बोअरला फायदा होतो. पाणी जमिनीत जात असल्याने भूजलाची पातळी वाढते. पण या तलावाकडे दुर्लक्ष केले जाते. पूर्वी तलावातील पाणी टँकरने टंचाईग्रस्त भागात दिले जात होते. ते देखील बंद केले आहे. अतिशय सुंदर अशा पाषाण तलावाचे रूपांतर आता कचरा डेपोसारखे बनले आहे. त्वरित येथील जलपर्णी काढून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी केली जात आहे.
————————-
२०१७ पर्यंत हा पाषाण तलाव अतिशय सुंदर होता. पण त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले आणि आता तिथे जलपर्णी, कचरा साठला आहे. पॅराडाइज फ्लायकेचरसारखे सुंदर पक्षी येथे यायचे. पण आता पक्षीच दिसत नाहीत.
- ऊमा डोंगरे, निसर्गप्रेमी
————————-