एका वर्षात जलपर्णीची समस्या संपेल : मुक्ता टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 09:08 PM2018-05-10T21:08:24+5:302018-05-10T21:08:24+5:30
महापाैर अापल्या दारी या उपक्रमांतर्गत पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक या नागरिकांशी संवाद साधतात. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाच्या नागरिकांशी संवाद साधताना जलपर्णीची समस्या येत्या वर्षभरात समूळ नष्ट करण्याचे अाश्वासन त्यांनी दिले.
पुणे : मुळा-मुठेच्या पात्रात विविध ठिकाणी हिरवेगार गालिचे पाहायला मिळतात. काहीवेळासाठी हे नदीचे पात्र अाहे की, एखादे उद्यान असा प्रश्न पडताे. शहरातील नद्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर वाढणारी जलपर्णी ही गंभीर समस्या अाहे. ही समस्या दूर करण्याचा विडा अाता महापाैर मुक्ता टिळक यांनी उचलला असून येत्या वर्षभरात जलपर्णीची समस्या संपलेली असेल असा विश्वास महापाैर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केला.
शहरातील नद्यांमध्ये वाढणारी जलपर्णी नागरिकांसाठी डाेकेदुखी हाेत अाहे. जलपर्णीमुळे नदीकाळच्या परिसरात डासांची निर्मिती हाेऊन त्याचा नागरिकांना त्रास हाेत अाहे. या डासांमुळे राेगराई व साथीचे अाजारही वाढत अाहेत. त्यामुळे जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने निश्चित याेजना तयार केली असून, एका वर्षात जलपर्णीची समस्या संपलेली असेल असा विश्वास मुक्ता टिळक यांनी व्यक्त केला. ‘महापौर आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून महापौर मुक्ता टिळक यांनी आज ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. नगरसेविक, काॅंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, लता राजगुरु, मंगला मंत्री, उमेश गायकवाड, लता धायरकर, हिमानी कांबळे, चांदणी शेख, उपायुक्त विजय दहीभाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापाैर म्हणाल्या, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने मुळा-मुठा नदी शुध्दीकरण प्रकल्पाच्या कामाची महापालिकेने बाणेर येथून सुरूवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे अकरा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. नदीत थेट जाणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे जलपर्णी वाढीवर व नदीच्या प्रदूषणाला आळा बसू शकेल. सध्या असलेली जलपर्णी काढण्यासाठी घ्यावी लागणारी यंत्रसामुग्री महागडी आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून हे काम पूर्ण करून घेणार आहोत. मुळा-मुठा नदी शुध्दीकरण प्रकल्पामुळे जलपर्णीचे समूळ उच्चाटन होऊ शकेल. या भागात ते काम होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल. होर्डिंगवरील अनधिकृत जाहिराती लावल्या जातात, मोहल्ला समितीच्या बैठकीला नगरसेवक उपस्थित राहत नाहीत, परिसरातील सांडपाणी वहनाची समस्या गंभीर आहे, वृक्षारोपणाबाबत निश्चित धोरण नाही, पीएमसी केअरची यंत्रणेचा प्रतिसाद मिळत नाही, मोठ्या आवाजात लावले जाणारे ध्वनिक्षेपक, मिळकतकर वसुलीची मोहिम प्रभावीपणे राबविली जात नाही, सोसायटीमध्ये कचर्यापासून खतनिर्मिती बनविण्यास सहकार्य मिळत नाही, भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो, रुग्णवाहिका व अग्निशमनच्या गाड्यांच्या वाहतुकीसाठी जागा नाही अशा समस्या नागरिकांनी महापौरांसमोर मांडल्या. या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.