इंद्रायणी नदीतील पाणी शेवाळल्याने सुटली दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:09+5:302021-04-05T04:10:09+5:30
- इंद्रायणीतील प्रदूषण भाग १ - आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड ...
- इंद्रायणीतील प्रदूषण भाग १ -
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील मैलामिश्रित सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत इंद्रायणी नदीतील पाणी हे पूर्णतः शेवाळले असून, जलपर्णीच्या विळख्यात सापडले आहे. नदीतील पाण्याला अक्षरशः दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊन रोगराई वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या अलंकापुरी शहरासह लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तर शहरालगतच्या गावांचीही लोकसंख्या हजारोंच्या घरात आहे. शहरातील तसेच लगतच्या गावांमधील बहुतांश सर्वच नागरिक इंद्रायणीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून पवित्र इंद्रायणीच्या पाण्याला प्रदूषणाचे ग्रहण जडले आहे. आळंदीच्या पश्चिमेला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची मोठी लोकसंख्या असून विविध कारखाने सुरू आहेत. परिणामी या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या-ज्या उद्योगात किंवा व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतर रसायन मिश्रीत पाणी विनाप्रक्रिया थेट इंद्रायणीच्या नदीपात्रात छुप्या मार्गाने सोडले जात आहे.
औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित पाणी आळंदीत वाहत येते. पावसाळ्यातील पुरात हे पाणी पुढे वाहून जाते, मात्र पावसाळा वगळता आठ महिने हे अशुद्ध पाणी नदीपात्रात साचले जाते. याच पाण्याचा उपयोग आळंदीकरांना करावा लागत आहे. सद्यस्थितीत नदीतील जलपर्णीयुक्त पाण्याचा उग्र वास येत असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून साथीचे आजार वाढण्याची चिन्हे आहेत.
"मैलामिश्रित तसेच रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. संबंधित विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही अशांवर कारवाई केली जात नाही.
- संदीप नाईकरे, आळंदी विकास मंच.
तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीतील दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे.