जुन्नर, आंबेगावसाठी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:38 AM2019-03-03T00:38:16+5:302019-03-03T00:38:19+5:30

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

Water for Junnar and Amegaon | जुन्नर, आंबेगावसाठी पाणी सोडणार

जुन्नर, आंबेगावसाठी पाणी सोडणार

Next

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मुंबई येथे झालेल्या कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. येत्या दि. ५ पासून पाच कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात येणार असून ते या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन असेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. आर. कानडे व शाखा अभियंता जे. डी. गळगे यांनी दिली.
पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकरिता शुक्रवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहावर कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे हे होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. शरद सोनवणे, आ. बाबूराव पाचर्णे, आ. राहुल जगताप, राजेंद्र नागवडे,. जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, मुख्य अधिकारी जयश्री काटकर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता के. आर. कानडे आदी उपस्थित होते.
या वेळी कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगे व डिंभे धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उन्हाळी आवर्तनाचे पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व लोकप्रतिनिधींनी दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी केली. जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे यांनी ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पिंपळगाव डावा मीना शाखा, डिंभे उजवा कालवा, मीना पूरक कालवा आणि घोड शाखा या कालव्यांद्वारे येत्या ५ मार्चपासून सोडण्यात येणार आहे. पिंपळगाव डावा मीना शाखा कालव्याद्वारे ३६ दिवस, डिंभे उजवा कालव्याद्वारे ४० दिवस, मीना पूरक कालव्याद्वारे ४ दिवस व घोड शाखा कालव्याद्वारे १२ ते १५ दिवस असे पाणी सोडण्याचे नियोजन आहे.
या कालव्यांद्वारे दि. ५ मार्च रोजी, घोड शाखा कालव्याद्वारे १४ मार्च रोजी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, पाण्याची मागणी लक्षात घेऊन लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबतही नियोजन सुरू आहे. पिंपळगाव जोगा धरणातून उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर पाण्याचे रोटेशन पूर्ण करण्यासाठी एप्रिल २०१९मध्ये या धरणातील मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन उन्हाळ्यातील हे शेवटचे आवर्तन असेल. या उन्हाळी आवर्तनाचा लाभ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना होणार आहे, अशी माहिती कानडे व गळगे यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी कालवा समितीची बैठक रद्द झाल्याने आवर्तन सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र, आज झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
>सध्या धरणातील उपलब्ध साठा असा
सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे- जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस ७,६४८ द.ल.घ.फू. (२५.०५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजमितीला याच धरणांमध्ये १७,२३३ द.ल.घ.फू. (५४.४३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.
सद्य:स्थितीला येडगाव धरणात ९२० द.ल.घ.फू. (४७.३३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकडोह धरणात ११९९ द.ल.घ.फू. (११.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणात २५१ द.ल.घ.फू. (२१.५० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
पिंपळगाव जोगा धरणात ८५७ द.ल.घ.फू. (२२.०४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. चिल्हेवाडी धरणात १,७५० द.ल.घ.फू. (२०.१७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तर, आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात ४,४१९ द.ल.घ.फू. (३५.३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

Web Title: Water for Junnar and Amegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.