पुण्यात पाणी गळतीला मीटरचा ‘ब्रेक’; जून २०२३ पर्यंत घराघरात बसणार पाणी मीटर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 10:00 AM2022-08-25T10:00:23+5:302022-08-25T10:01:27+5:30

दोन झोनमध्ये गळती ४० वरून १६ टक्क्यांवर

Water leakage meter 'break' in Pune; By June 2023, water meters will be installed in households | पुण्यात पाणी गळतीला मीटरचा ‘ब्रेक’; जून २०२३ पर्यंत घराघरात बसणार पाणी मीटर

पुण्यात पाणी गळतीला मीटरचा ‘ब्रेक’; जून २०२३ पर्यंत घराघरात बसणार पाणी मीटर

Next

पुणे : महापालिकेने खडकवासला धरणातून पाणी उचलल्यावर घराघरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यात ३५ ते ४० टक्के गळती होते. ही गळती थांबविण्यासाठी महापालिकेने प्रत्येक नळजोडला मीटर बसवत ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे. या अंतर्गत दोन झोनमध्ये मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. येथे पाणी गळतीचे प्रमाण ४० वरून १६ टक्क्यांवर आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत प्रत्येक नळजोडला मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे मीटर बसविण्यासाठी शहरात १३२ झोन तयार केले आहेत. त्यापैकी दोन झोनमध्ये मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात तंत्रज्ञानाचा वापर करून समान पाणी वाटप करणे, पाण्याचे ऑडिट करणे, अनधिकृत नळ जोड, दुबार नळजोड शोधणे हे पाणी मीटर बसविल्यावर सहज शक्य होणार आहे. प्रती व्यक्ती दररोज दीडशे लिटर पाणी मिळालेच पाहिजे हा यामागील उद्देश आहे.

महापालिकेने २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम २०१८ ला हाती घेतले. कोरोना आपत्तीच्या काळात हे काम थंडावले होते; परंतु गेल्या काही महिन्यात या कामाने जोर धरला असून, जुन्या जलवाहिन्यांच्या जागी ४०० कि.मी.च्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मिळकत कर विभागाकडील शहरातील मिळकतीच्या नोंदीनुसार ३ लाख १८ हजार ८४७ पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत मीटर बसविण्याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, जून २०२३ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

एएमआर मीटर्सचे फायदे

- शहरात २००१ पर्यंत प्रत्येक नळजोडला पाणी मीटर होते. हे मीटर मेकॅनिकल मीटर्स असल्याने त्याचे तोटे खूप होते. सदर मीटर हवेमुळेही फिरत असल्याने पाणी वापर झाला नाही तरी पूर्वी बिलिंग होत होते. तसेच पाण्याचा दाबही कमी होत होता. महापालिकेने आता साडेसात हजार रुपये किमतीचा एएमआर मीटर घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे इलेक्ट्रिक फुल बोअर मीटर असल्याने पाणी वहनामध्ये कोणताही अडथळा येणार नसून, पाण्याच्या दाबावरही कोणताही परिणाम होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

- या मीटरचे आयुष्यमान हे १० वर्षांचे असून, हे सर्व मीटर महापालिकेच्या मुख्य सर्व्हरला जीपीआरएस प्रणालीने जोडले जाणार आहेत. यामुळे थेंबा-थेंबाचा हिशोब ठेवणे शक्य होणार असल्याचेही पावसकर यांनी सांगितले.

असे होणार मोजमाप

- खडकवासला धरणातून समजा दहा हजार लिटर पाणी घेतले तर ते पाणी जलवाहिनीतून महापालिकेच्या टाक्यांमध्ये किती प्रमाणात येते, तेथून पुढे प्रत्यक्ष नळजोडद्वारे घरात किती जाते. याची सर्व नोंद पंधरा मिनिटाला महापालिकेला मिळणार आहे.

- यात ऑटोमॅटिक वॉल सुरू करणे, कोणत्या भागात कमी पाणी गेले, कोठे जास्त पाणी गेले याची नोंद लागलीच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला होणार आहे. यामुळे पाण्याचे समान वाटप करण्यावर नियंत्रण ठेवता येणार असून, अतिरिक्त पाणी अथवा वाया जाणारे पाणी रोखता येणार आहे.

Web Title: Water leakage meter 'break' in Pune; By June 2023, water meters will be installed in households

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.