नीरा देवघर कालव्याला सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 07:37 PM2018-03-30T19:37:13+5:302018-03-30T19:37:13+5:30
शेतकऱ्यांनी नीरा देवघर धरणाच्या सांगवी भाटघर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे निवेदन देऊन मागणी केली होती.
भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि मागील दीड महिन्यांपासून नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याला गुरुवारी रात्री उशिरा ५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्यामुळे पिकाला जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या नीरा देवघर धरणात सध्या ४२ टक्के पाणीसाठा असून, धरणातून नीरा नदीत ८०० क्युसेक्सने पाणी सोडले आहे. मात्र नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडले होते. त्यानंतर तब्बल मागील दीड महिन्यापासून पाणी सोडले नसल्याने भावेखल, अंगसुळे, कंकवाडी, सांगवी, करंजे, नाटंबी, आंबेघर, शिरवलीतर्फे भोर, वेनवडी, उत्रौली, वडगावडाळ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमूग, ऊस व इतर पिके वाळून जात आहेत.
यामुळे नाटंबी येथील शेतकऱ्यांनी नीरा देवघर धरणाच्या सांगवी भाटघर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र वरून आदेश नसल्याने पाणी सोडण्यात येत नसल्याचे सांगितले. यामुळे निराश होऊन शेतकरी परत आले होते.
भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणभागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि धरण १०० टक्के भरते. या वर्षीही धरण १०० टक्के भरले होते. धरणातून नीरा नदीत मागील चार महिन्यांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदरचे पाणी वीर धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून बारामती आणि फलटणला जाते. हे चक्र सुरू आहे. मात्र धरण असलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी का मिळत नाही, त्यासाठी नियमावली लावली जाते.