नीरा कालव्यात सोडले पाणी
By admin | Published: May 9, 2017 03:25 AM2017-05-09T03:25:14+5:302017-05-09T03:25:14+5:30
शेतकरी संघटनेने काझड (ता. इंदापूर) येथे खडकवासला व नीरा डाव्या कालव्याला जोडणाऱ्या सणसर जोडकालव्यात पाणी सोडून आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भवानीनगर : शेतकरी संघटनेने काझड (ता. इंदापूर) येथे खडकवासला व नीरा डाव्या कालव्याला जोडणाऱ्या सणसर जोडकालव्यात पाणी सोडून आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नवनाथ बनसोडे, हनुमंत वीर, पांडुरंग बनसोडे, हनुमंत बनसोडे आदींसह शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
काझड, शिंदेवाडी, अकोले भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी सणसर जोडकालव्यासाठी संपादित झाल्या आहेत. मात्र, कालवा सुरू होऊनदेखील जोडकालव्याचा या शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. हक्काच्या जमिनी देऊनही शेती कोरडीच पडत आहे. दरवेळी पाण्यासाठी या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते.
पिके जळून चालल्याने या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यानुसार रायते व इतर पदाधिकाऱ्यांनी शाखा अभियंता पाटील यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचा संयम संपण्याअगोदर जोडकालव्यात पाणी सोडा, अशी मागणी रायते यांनी केली. त्यानंतर कालव्यात पाणी सोडले.
या वेळी जिल्हाध्यक्ष रायते यांनी सांगितले, की पाणी पुरेपूर असूनही पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ते वेळेवर मिळत नाही. बागायती भागाबरोबरच दुष्काळी भागाचेही प्रश्न पाण्याअभावी वाढल्याने आंदोलन करण्याची वेळ आली.
दरम्यान, शनिवारी (दि. ६) काँग्रेस व राष्ट्रवादीने सणसर येथे
नीरा डाव्या कालव्याच्या वितरिकेला पाणी सोडण्यासाठी शनिवारी
सकाळी आंदोलन केले. त्यामुळे पाण्यावरून येथील वातावरण तापले आहे.