आळंदीत इंद्रायणीवर जलपर्णीचा थर, भाविकांची तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:09 AM2018-03-06T03:09:24+5:302018-03-06T03:09:24+5:30
देहू येथे संत तुकाराममहाराज बीजसोहळा होत असल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. इंद्रायणी नदीपात्रात भाविकांना स्नानास पाणी मिळावे म्हणून सोय करण्याची मागणी होती. मात्र, या पाण्यासमवेत आळंदीतील नदीपात्राला वरील बंधा-यातून जलपर्णी वाहून आल्याने जलपर्णीच्या विळखा पडला आहे.
आळंदी - देहू येथे संत तुकाराममहाराज बीजसोहळा होत असल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. इंद्रायणी नदीपात्रात भाविकांना स्नानास पाणी मिळावे म्हणून सोय करण्याची मागणी होती. मात्र, या पाण्यासमवेत आळंदीतील नदीपात्राला वरील बंधा-यातून जलपर्णी वाहून आल्याने जलपर्णीच्या विळखा पडला आहे. यामुळे भाविकांच्या स्नानाची सोय होण्याऐवजी गैरसोयच झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. यातून येथील नियोजनावर भाविकांनी ताशेरे ओढले.
तीन मार्च रोजी संत तुकाराम बीज सोहळा झाला. यानिमित्त आळंदी-देहूमध्ये राज्यातून भाविकांची मांदियाळी ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’चा नामजयघोष करीत हरिनामाच्या गजरात देवदर्शनासाठी आली होती. भाविकांच्या स्नानाची आळंदीत व्यवस्था होण्यासाठी इंद्रायणी नदीपात्रात आळंदी परिक्षेत्राच्या धरणातून मागणीप्रमाणे पाणीदेखील सोडण्यात आले. आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती उपनगराध्यक्ष सागर भोसले, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी याबाबत इंद्रायणी नदीपात्रात पाणी कमी झाल्याचा अहवाल मिळाल्याने मागणी करण्याचा निर्णय घेतला होता. बीज सोहळ्याला देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी इंद्रायणी नदीत तीर्थक्षेत्री स्नानमाहात्म्य जोपासत स्नानदेखील केले. बीज झाल्यानंतर बंधाºयातून खाली पाणी सोडण्यासाठी खुले केलेले बर्गे (फळ्या) बंद न केल्याने संत तुकाराम बीजेला करण्यात आलेली सोय नंतर मात्र गैरसोय ठरली. यात केवळ नियोजनाचा अभाव असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करून आळंदी नगर परिषदेच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. बीज झाल्यानंतरच्या नियोजनाचा परिषद प्रशासनाला विसर पडल्याने गैरसोय वाढल्याचे भाविकांनी सांगितले.
सध्या आळंदी येथे इंद्रायणी नदीपात्रात येणाºया पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पाण्याचा निर्धारित साठा वाढल्याने बंधाºयातील पाणीपातळी वर आली. यामुळे बंधाºयातील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहून आल्याने सोय होण्याऐवजी आता गैरसोय होऊ लागली. जलपर्णी काढण्याची प्रक्रिया निविदेत अडकली असून, इंद्रायणी नदीपात्रावरील जलपर्णी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, इंद्रायणी नदीपात्राच्या दुतर्फा अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदीला अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याची चर्चा होत आहे.
स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने इंद्रायणी नदीतील प्रवाह सतत वाहता असणे गरजेचे आहे. यासाठी पुणे पाटबंधारे विभागाकडे बंधाºयातून आळंदीकडे इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, पाणी आळंदीत आल्यानंतरच्या नियोजनाचा आळंदी नगर परिषद प्रशासनाला विसर पडला.
संत तुकाराम बीज सोहळ्याला देहू येते येताना तसेच काही भाविक परतीच्या प्रवासात आळंदीत संत ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी दर्शनाला परंपरेने येतात. ‘श्रीं’चे दर्शन व तीर्थक्षेत्री स्नानाची गैरसोय होऊ नये, यासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.
बीजेपर्यंत जलपर्णीमुक्त असलेली इंद्रायणी बीजेनंतर मात्र पाण्याबरोबर वाहून आलेल्या जलपर्णीने युक्त झाल्याने
येथे नागरिक व भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाविकांना स्नान करता आले नाही की पायावर पाणी घेता आले नाही. या गैरसोयीस आळंदीत त्यांना सामोरे जावे लागले.
इंद्रायणी करणार जलपर्णीमुक्त : नगराध्यक्षा उमरगेकर
तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याबरोबर वाहून आलेली जलपर्णी बाहेर काढण्यात येईल, असे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. आळंदीतील पाण्याची पातळी खालावली होती. तुकाराम बीज सोहळ्याला भाविकांची सोय करण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडले होते. यामुळे भाविकांची स्नानाची सोय संत तुकाराममहाराज बीज दिनी ३ मार्च रोजीा झाली. त्यानंतर पाणी येतच राहिल्याने त्यारोबर महापालिकेच्या हद्दीतील नदीपात्रातून जलपर्णी आळंदीकडे खाली आली. यापुढील काळात जलपर्णीमुक्त इंद्रायणी नदीपात्र ठेवण्याचे नियोजन आहे. यासाठी निविदादेखील आल्या आहेत. लवकर प्रशासकीय कामकाज झाल्यानंतर जलपर्णी काढण्यात येईल. आळंदीतील नदीपात्र जलपर्णीमुक्त तसेच नदीचा परिसर दुतर्फा स्वच्छ, सुंदर करणार असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.