पाणीपातळीत घट, ग्रामस्थांची भटकंती; गुळाणीचा तलाव पडला कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:44 AM2019-01-30T01:44:28+5:302019-01-30T01:44:37+5:30

पाण्यासाठी जनावरांची दाहीदिशा, तालुका दुष्काळाच्या छायेत

Water level reductions, wandering villagers; Sugarcane pond is dry | पाणीपातळीत घट, ग्रामस्थांची भटकंती; गुळाणीचा तलाव पडला कोरडा

पाणीपातळीत घट, ग्रामस्थांची भटकंती; गुळाणीचा तलाव पडला कोरडा

googlenewsNext

वाफगाव : खेडच्या पूर्व भागाला जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्याच्या झळा जाणवू लागल्या असताना गुळाणी (ता.खेड) येथील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आणि ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे असे येथील नागरिक बोलत आहेत. या गावात नळपाणी पुरवठ्याची नवीन स्कीम झाली. त्यासाठीची विहिर देखील पाझर तलावामध्येच आहे. तरी देखील विहिरीत पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत.

गुळाणी येथे १९९७ साली छोटे पाटबंधारे विभागामार्फत पाझर तलावाचे काम सुरू झाले व २००५ मध्ये पूर्ण करण्यात आले. तसेच या तलावातून शेतीसाठी पाणी उपसण्याची कुणालाही परवानगी नाही. तरीदेखील स्थानिक शेतकरी कुणालाही न जुमानता तलावातुन इलेक्ट्रीक मोटार, इंजिन आदींच्या सहाय्याने राजरोसपणे पाणी उपसतात व त्यामुळे हा पाझर तलाव जानेवारी महिन्यातच कोरडा पडला आहे. म्हणून गुळाणी ग्रामस्थांनां पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. पाणी उपसा करणाऱ्यांना गावातील इतर नागरिकांची व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची थोडीदेखील काळजी वाटली नाही ही मोठी चिंतेची बाब आहे. गुळाणी गावातील काही महाभागांनी पाझर तलावातील पाणी उपसताना त्यांना आपल्याच गावातील बांधवांची पुढील ५ महिन्याची काळजी वाटली नाही तर मग अशा संवेदनाहीन नागरिकांसाठी शासनाने तरी का पाणी पुरवावे अशी देखील चर्चा परिसरातील नागरिक करू लागले आहेत.

तलावातील पाणीउपसा बंद करावा असे पत्रदेखील तहसील कार्यालयाने संबंधित प्रशासनाला दिले आहे तरी देखील संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे गुळाणी ग्रामस्थांना सध्या पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत असे मत देखील नागरिक मांडत आहेत. दरवर्षी याच कारणांमुळे गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. दरवर्षी शेतीसाठी या तलावातुन बेसुमार पाणीउपसा होत आहे. परंतु आजतागायत यांवर कुठलेही निर्बंध आले नाहीत.

याच परिसरात काही प्रमाणात वन्य प्राणीदेखील आहेत व त्यांना पाणी पिण्यासाठी गुळाणी पाझर तलाव हेच एकमेव ठिकाणा होते. परंतु तिथेच सध्या पाणी उपलब्ध नसल्याने या वन्यप्राण्यांनी पाणी पिण्यासाठी कुठे जायचे हा देखील एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही नागरिकांच्या मते गावातील सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील याच तलावातून अनधिकृतरीत्या पाणीउपसा केल्याने तलाव कोरडा पडला आहे.

बारमाही वाहणाऱ्या नद्या कोरड्या
दावडी : हिवाळा संपत येऊन उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली आहे. परंतु हिवाळा संपण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच शेती शिवारातील नदी-नाल्यांसह तलावांना कोरड पडली. ही कोरड चिंतनीय असून जलसंकट होण्याचे संकेत आहेत.
खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या हंगामात झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेती शिवारातील कमीत कमी बारमाही वाहणारे नदी-नाले तलाव पूर्णत: कोरडे झाले आहेत. हेच नदी-नाले, तलाव जनावरांना पाणी पिण्याचे एकमेव स्रोत आहे.
नदी तलाव नाल्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांवर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्यांची वेळ आली आहे.
उन्हाळा लागण्यापूर्वीच नदी नाले तलाव कोरडे पडल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. यावर्षी कमी पावसामुळे गाडकवाडी, गुळाणी, ठाकरवस्ती वरील तलाव कोरडे पडले आहेत.
वाफगाव येथील मातीच्या धरणात अत्यल्प जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वरुडे, कनेरसर येथील वेळ नदीवरील बंधारे दोन महिन्यापूर्वीच कोरडे पडले आहेत. शेतकºयांनी कशीबशी खरिपातील पिके घेतली मात्र अत्यल्प पावसामुळे लक्षणीय घट झाली.

रब्बी हंगामात शेतकºयांनी पाण्याअभावी पेरणी केली नाही. बहुतांश गावाच्या नळयोजना या नदी व नाल्याच्या तीरावर आहेत. नदी-नाल्यांना आत्ताच पडलेली कोरड पाहता उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होणार आहेत.

खेड तालुक्यात तलावात पाणी नसल्यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे विहिर बागायत असलेल्या पिकांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा परतीच्या पावसाने परिसराकडे काणाडोळा केल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला होता. परिसरातील धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे.

ग्रामपंचायतीने पाणी उपसा करणाºया शेतकº्यांना नोटिसा दिल्या होत्या तरीदेखील संबधितांनी पाणी उपसा सुरूच ठेवला. महसूल व लघु पाटबंधारे विभागाला देखील पत्रव्यवहार केला होता परंतु त्यांनी देखील कुठलीही कारवाई न केल्याने हा पाझर तलाव कोरडा पडला आहे. व त्यामुळे याच महिन्यात आम्हांला टँकरने पाणी पुरवठा करावा म्हणून आम्ही शासनाला पत्र दिले आहे.
- दिलीप ढेरंगे,
सरपंच, गुळाणी

पाझर तलावातून पाणी उपसा करण्याची कुणालाही परवानगी नाही. आम्ही ग्रामपंचायतीलादेखील पत्र पाठवून पाणीउपसा करणाºया शेतकºयांवर कारवाई करण्यास सांगितले होते व आम्ही स्वत: तिथे जाऊन वीज पुरवठा खंडित केला होता परंतु तेथील नागरिकांनी रात्री-अपरात्री चोरून पाणीउपसा केल्याने पाझर तलाव कोरडा पडला आहे.
- दीपक गोडे, उपअभियंता
छोटे पाटबंधारे
विभाग

Web Title: Water level reductions, wandering villagers; Sugarcane pond is dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.