पुण्यात पुन्हा पाणीच पाणी; प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 09:56 AM2019-01-17T09:56:34+5:302019-01-17T10:05:01+5:30
जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं रस्त्यावर गुडघाभर पाणी
पुणे : पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. तब्बल 2 तास पाणी वाहून गेल्याने 4 फुटांपर्यंत पाणी साचले होते. हे पाणी 8 ते 10 घरांमध्ये शिरल्यानं स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे पुणेकरांसाठी दुष्काळात तेरावा अशीच काहीशी परिस्तिथी झाली.
धरणातील पाण्याच्या वाटपावरून जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेमध्ये वाद आहेत. काल संध्याकाळी जलसंपदा विभागाने पालिकेला देण्यात येणारे पाणी अचानक बंद केले. त्यामुळे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या संतप्त झाल्या. आज शहराचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वती पर्यंत येणाऱ्या 1600 मी व्यासाच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह बंद करण्यात येत होता. त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये याच भागात मुठा कालवा फुटला होता. त्यावेळीही लाखो लिटर पाणी वाहून गेले होते. तसेच दांडेकर पूल वसाहतीतील शेकडो लोक बेघर झाले होते.