कपातीतही पाण्याचा होतोय काळाबाजार

By admin | Published: May 18, 2017 05:57 AM2017-05-18T05:57:06+5:302017-05-18T05:57:06+5:30

महापालिका परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा केल्याच्या संधीचा फायदा टँकर लॉबी घेत आहे. महापालिकेकडून सवलतीच्या दरात पाणी घेऊन जादा दराने पाणी

Water Market | कपातीतही पाण्याचा होतोय काळाबाजार

कपातीतही पाण्याचा होतोय काळाबाजार

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : महापालिका परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा केल्याच्या संधीचा फायदा टँकर लॉबी घेत आहे. महापालिकेकडून सवलतीच्या दरात पाणी घेऊन जादा दराने पाणी विकण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. एक टँकर दोन ते तीन हजार रुपयांनी विकला जात आहे.
मात्र, महापालिका प्रशासन टँकर माफियांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. सत्ताधारी पक्षातील पदाधिका-यांनी शहरात कोठेही टँकरने पाणी पुरवठा होत नसल्याचा दावा केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात ३२ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे दररोजच्या पुरवठ्यात २० टक्के कपात करून दिवसाआड पाण्याचे नियोजन कामगार दिनानंतर केले आहे. आयुक्त-महापौरांनी बैठक घेऊनही दोन आठवड्यांनंतर पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. शहरातील ग्रामीण भागात पाणीविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. पिण्याचे पाण्याचा वापर बांधकामाला जादा दराने करीत पाण्याचा काळाबाजार सुरू आहे.
महापालिकेचे केवळ सहा टँकर
महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांत सहा टँकर आहेत. नागरिकांनी मागणी केल्यास पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दुसरीकडे काही टँकरवाल्यांनी महापालिकेशी करार करून पिण्याचे पाणी उचलले आहे. महापालिकेकडून प्रति टँकर अडीचशे ते तीनशे रुपये आकारले जातात. पुढे तेच टँकर सुमारे दोन ते तीन हजारांना विकले जात असल्याची माहिती काही टँकरवाल्यांनी नाव न देण्याच्या अटीवर दिली.
जलसाठ्यात होतेय घट
पाणी कमी झाल्याने इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीतील पाणी उचलले जात आहे. पात्रालगत बोअरवेल खोदल्या आहेत. तसेच मोटर लावून बेकायदा पाणी उचलले जात आहे. हे पाणी एका टाकीत भरून तेथून टॅँकरने थेट बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांवर दिले जात असल्याचे दिसून आले.
किवळे, रावेत, वाकड, चऱ्होली, मोशी परिसरातील प्रकल्पांवर बांधकाम प्रकल्पांना पाणी पुरविले जात आहे. चऱ्होली परिसरात सुमारे अडीच ते तीन हजार रुपये दर आकारला जातो. तसेच खासगी सोसायट्यांमध्ये पाणी पुरवण्यासाठी दोन हजार रुपये उकळले जात आहेत. पाणी कमी झाल्याने शहरात पाणीकपात केली आहे. मात्र, नद्यांमधून पाणी उचलून काळाबाजार करणाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

राजकारण्यांकडे टँकरचा ठेका
मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोविसावाडी, चिखली, प्राधिकरण, ताथवडे, वाकड, पुनावळे, रावेत, किवळे, चिखली परिसरात टँकरमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. या पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून टँकरवाल्यांसाठी पोषक धोरण राजकारण्यांनी अवलंबिले आहे. पाण्याचे टँकर हे राजकारण्यांशी संबंधित आहेत. प्रत्येक टँकरवर अमुक एक नेत्याच्या आशीर्वादाने असा उल्लेख आहे. क्षेत्रीय अधिकारी, पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कृत्रिम पाणीटंचाई केली जात आहे. त्यामुळे पाणीचोरांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न आहे. तसेच किती अंतर आहे, यावरूनही दर कमी-अधिक प्रमाणात केले आहेत.

अशी होतेय लूट (प्रति टँकर/रुपये)
परिसर बांधकामांसाठी पाणीपिण्यासाठी विक्री
चऱ्होली२५०० ते ३२००२००० ते २३००
मोशी २२०० ते ३००० १८०० ते २०००
वाकड२५०० ते ३०००२००० ते २५००
किवळे२३०० ते ३०००१८०० ते २०००
चिखली १८०० ते २५००१२०० ते १५००

Web Title: Water Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.