निवडणूकीत पाणी योजना ठरणार कळीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:28 AM2020-12-13T04:28:21+5:302020-12-13T04:28:21+5:30
उरुळी कांचन: गेल्या अकरा वर्षापासून उरुळी कांचनचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. कधी पाठपुरावा तर कधी तांत्रिक त्रुटींची पुर्ततेच्या ...
उरुळी कांचन: गेल्या अकरा वर्षापासून उरुळी कांचनचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. कधी पाठपुरावा तर कधी तांत्रिक त्रुटींची पुर्ततेच्या गर्तेत ही योजना अडकली. लोकप्रतिनींकडूनही होणारे दुर्लक्ष ही बाबही तितकीच महत्वाची आहे. नुकतीच ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात पाणी योजना कळीचा मुद्दा ठरणार आहे. सत्ताधारी असो वा विरोधक यांना पाणी प्रश्नाबाबत मतदारांना अपेक्षित असे उत्तर द्यावेच लागणार आहे. दरम्यान, गावातील वातावरण या योजनेमुळे चांगलेच तापले असल्याने ही योजना कोणाला तारक ठरणार हे येणारा काळच ठरवेल.
उरुळी कांचन शहरासाठी २००९ वर्षापासून विस्तारीत पाणी पुरवठा योजना साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आगामी २५ वर्षातील पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली. राज्य सरकारने राष्ट्रीय पेयजल योजनेतून उरुळी कांचन शहरासाठी सुमारे ७० कोटी रुपये अंदाजपत्रकाच्या विस्तारीत योजनेला काही बाबींच्या कागदपत्रांची पूर्तता कण्याच्या अटीवर आधारित तांत्रिक मंजुरी मिळाली. त्यानंतर २०१८ साली तत्कालीन आ. बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून मंत्रालयात काही बैठका होऊन तत्कालीन पाणी पुरवठा व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या योजनेला तांत्रिक मंजुरी दिली होती. पण उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाने काही त्रुटींची पुर्तता न केल्याने शासन दरबारी ही योजना प्रशासकीय मंजुरीच्या प्रतिक्षेत राहिली ती अजूनही तशीच आहे.
गेल्या अकरा वर्षापासून पाणी योजनेला ग्रहण लागले आहे. स्थानिक लोकप्रतीनिधींदेखील या योजनेच्या पाठपुरावा न केल्याने उरुळीकरांना वंचित रहावे लागले आहे. नुकतीच १५ जानेवारीला ग्रामपंचायच निवडणूकीचा धुरळा उडणार आहे. आतापासून अनेकांनी गुडघ्याला बांशिग बांधून आपण उमेवार आहे असे समजून प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु. या निवडणूकीत विकास कामांबरोबरच पाणी योजना कळीचा मुद्दा ठरणार आहे. या योजनेभवतीच संपूर्ण निवडणूक फिरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पाणी योजनेसंदभार्त कोणालाही अपेक्षीत असे उत्तर देता आले नाही. त्यामुळे नागरिकांनीही हाच मुद्दला उचलून प्रस्थापित आणि नवख्यांना सद्या तरी धोबीपिछाड केली आहे. निवडणूकीला महिन्याचा कालावधी असून नागरिकांची मनधरणी कोण कशा पद्धतीने करणार अन् कशाची बोळवण घालणार हे पाहणे मात्र, औत्सुक्याचे ठरणार आहे.
एक वर्षापूर्वी स्थापित झालेल्या महाविकास आघाडी सरकारने अर्थिक नियोजनाचा आढावा घेताना राज्यातील काही महत्वाचे प्रकल्प आणि पाणी पुरवठा योजनांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला, पण आता चाकणच्या पाणी पुरवठा योजनेला निधी मंजूर झाल्याने उरुळी कांचनचे नागरिक आपला हा प्रश्न कोण सोडवणार असा सवाल उपस्थित केला आहे. अद्यापर्यंत कोणीही याला उत्तर दिले नाही. त्यामुळे या प्रश्नावरुनच निवडणूकीतील उमेदवारांना कोडींत पकडण्याची रणनीति आखण्याचे काम सुरु असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघ, सजग नागरिक मंचच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी सांगितले.