तिढा पाण्याचा : बारामती-माढाचे खासदार जलसंपदा विभागात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 08:45 PM2019-06-10T20:45:56+5:302019-06-10T20:58:25+5:30
नीरा डाव्या कालव्यातून बारामती परिसराला आणि उजव्या कालव्यातून सोलापूर भागाला पाणीपुरवठा होतो...
पुणे : नीरा देवघर धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून बारामती-सोलापूरला दिल्या जाणाऱ्या पाणी कोट्याचे वादंग सुरु असतानाच बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोमवारी (दि.१०) जलसंपदाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र भेट घेतली. तसेच, नीरा कालव्यासह आपापल्या मतदारसंघातील पाणी पुरवठ्याच्या कामांचा आढावा घेतला.
नीरा डाव्या कालव्यातून बारामती परिसराला आणि उजव्या कालव्यातून सोलापूर भागाला पाणीपुरवठा होतो. त्यातील जवळपास ६० टक्के पाणी बारामती परिसराला जाते. त्याचा करार २०१७ साली संपुष्टात आला. तसेच, जलसंपदा विभागाने देखील २०१८ साली नवा करार करण्याबाबत राज्य सरकारला कळविले आहे. माढाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बारामतीला अधिक पाणी जात असल्याचा दावा करत नवा करार करण्याची मागणी केली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.
त्या पार्श्वभूमीवर खासदार निंबाळकर यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नीरा देवघर प्रकल्पामधून निरा डाव्या कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत चर्चा केली. नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला मिळणारे अतिरिक्त पाणी थांबविण्याची शिफारस महाराष्ट्र कृष्णा खोरे व विकास महामंडळाकडून राज्यशासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
निरा देवघर धरणातील पाणी हे निरा डाव्या कालव्यातून बेकायदेशीररित्या बारामती परिसराला दिले जात होते. त्यामुळे निरा डाव्या कालव्याच्या अंंतर्गत असलेले फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी पाणी मिळत होते. यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या गावांत सध्या सुरु असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि विद्यमान पाणी योजना, तलाव, धरणांतील उपलब्ध पाणी साठा आणि विंधन विहिरींचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी यांच्यासह पुरंदर, बारामती, मुळशी, भोर विधानसभा मतदार संघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.
मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी येथील तलावात पावसाळ्यामध्ये एका वेळेस पाणी सोडल्यास प्रामुख्याने मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो, असेही सुळे यांनी यावेळी सांगितले.