केंदूर व परिसरात पाणी प्रश्न बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:22+5:302021-08-15T04:13:22+5:30
हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच ...
हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती
केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच रोजच्या पाण्याचा प्रश्नही सध्या उद्भवत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप पावसाने पाठ फिरवलेली असून येथील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ जाणवू लागले आहे. थिटेवाडी बंधारा अद्यापही कोरडाच असून वेळ नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे रिकामे पडलेले आहे. त्यामुळे हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहेत.
केंदूप परिसरातील शेतात सोयाबीन, वाटाणा, मूग ही पिके असून त्यांची दाणे भरण्यात आलेल्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल. त्यामुळे ती पिके सुकत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पिकवाढीसाठी केलेला खर्च वाया जातो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे. थोड्याफार प्रमाणात असलेल्या पाण्यावर कांद्याची रोपे टाकावी का? पुढील काही दिवसात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होईल का, अशी चिंता शेतकऱ्यांना होऊ लागली आहे.
केंदूर व परिसरातील वाड्यावस्त्या पावसावरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडू लागले आहे. 'पाणीदार केंदूर'च्या माध्यमातून ओढा खोलीकरण, तलाव खोलीकरण, ओढ्यावरील बंधारे कामे करण्यासाठी आहेत मात्र पावसाने दिलेल्या ओढीमुळे सध्याचे चित्र भयावह वाटू लागले आहे. केंदूरला पाणी पुरवठा करणारी थिटेवाडी येथील विहीर पूर्णपणे कोरडी पडली असून सध्या चौफुला येथील पाइपलाइनद्वारे पाणी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये होणारा बिघाडामुळे चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे सरपंच सुवर्णा थिटे व उपसरपंच भरत साकोरे यांनी सांगितले.
--
आधीच दुष्काळ त्यात वीजमंडळाकडून अन्याय
कायमच दुष्काळी परिस्थितीत होरपळत असलेल्या केंदूरची परिस्थिती मागील वर्षी बरी होती मात्र यंदा भर पावसाळ्यातच पाणी प्रश्न भेडसावू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यातच वीज मंडळाने वीजजोडणी बंद करण्याचा धडाका सुरू केल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे थिटेवाडी बंधारा, वेळ नदीवरील बंधारे, वाड्या वस्तीवरील तलाव, अोढे भरून वाहण्यासाठी खूप मोठ्या पावसाची गरज या भागातील शेतकऱ्यांना आहे.
--
फोटो क्रमांक: केंदूर परिसरातील पाणी टंचाई
फोटो ओळ - केंदुर (ता. शिरूर) परिसरातील विहिरीची पाणी पातळी खालावल्यामुळे दुष्काळाची झळ जाणू लागलेली आहे.