पुण्यात पाणी पुरेसे नाही; पाणीपट्टीत १५ टक्के वाढ, भाजपाकडून पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:16 AM2019-02-08T02:16:35+5:302019-02-08T02:16:47+5:30

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असताना पुणेकरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.

Water in Pune is not enough; Water Supply Increase by 15%, BJP approves water bill increase | पुण्यात पाणी पुरेसे नाही; पाणीपट्टीत १५ टक्के वाढ, भाजपाकडून पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव मंजूर

पुण्यात पाणी पुरेसे नाही; पाणीपट्टीत १५ टक्के वाढ, भाजपाकडून पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव मंजूर

Next

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असताना पुणेकरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून शहराल २४ बाय ७ समान पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपट्टीत दरवर्षी १५ टक्के वाढ करण्यात येत असून, गुरुवारी झालेल्या करवाढीच्या खास सभेत काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेचा विरोध असताना सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर पाणीपट्टीत १५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला.
महापालिका आयुक्तांनी २०१९-२०च्या अंदाजपत्रकात मिळकत कर आणि पाणीपट्टी दरात वाढ सुचविली होती. स्थायी समितीने मिळकतकरातील दरवाढ फेटाळून लावली होती; परंतु चोवीस तास पाणीपुरवठा योजना मंजूर करताना दरवर्षी १५ टक्के पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय सर्वसाधारण सभेत घ्यावा, या स्थायी समितीतील सदस्यांनी केलेल्या शिफारशीवरून गुरुवार (दि.७) रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या सदस्यांनी शहरात सुरू असलेली
पाणीकपात आणि दरवाढ रद्द करावी, यासाठी सभागृहामध्ये आंदोलन केले. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने एकत्र येत चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे उभारण्यात आले आहेत; तसेच केंद्र शासनही अनुदान देणार आहे. त्यामुळे पुणेकरांवर दरवाढ लादू नये, अशी उपसूचना दिली होती. सत्ताधारी भाजपाने ही उपसूचना फेटाळून लावत २०१६च्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार १५ टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मंजूर केला.

पालिकेला उत्पन्न वाढविण्यासाठी मिळकतकर, तसेच पाणीपट्टीच्या थकबाकीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. दुर्दैवाने प्रशासनाकडून थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. राज्य शासनाकडेही महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. परंतु, सत्ताधारी यासाठी पाठपुरावा करत नाहीत. थकबाकी वसूल झाली, तरी पुणेकरांच्या खिशात हात घालायची गरज राहाणार नाही, अशी भूमिका नगरसेवक पृथ्वीराज सुतार, नाना भानगिरे, अरविंद शिंदे, वसंत मोरे, अविनाश बागवे, पल्लवी जावळे, विशाल धनवडे, योगेश ससाणे यांनी मांडली. योजना मंजूर करताना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकल्पीय खर्च निघावा, यासाठी दर वर्षीच्या दरवाढीला पाठिंबा दिला होता. परंतु, सध्या ज्या पद्धतीने पाणी असूनही नागरिकांना त्याचा पुरवठा केला जात नाही. पाटबंधारे विभागाच्या मनमानी कारभारामुळे पुणेकरांवर अघोषित पाणीबाणी लादली जात आहे. याला विरोध म्हणून पाणीपट्टी दरवाढ करू नये, अशी आमची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले.

सभागृहनेते श्रीनाथ म्हणाले, की मिळकतकरामध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. २०१६ मध्ये सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयानुसारच १५ टक्के पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी उपसूचना मागे घ्यावी आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भिमाले यांनी केले. विरोधकांनी दिलेली उपसूचना फेटाळून लावत भाजपाने दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.

छुपी कपात : पुढील दोन-तीन दिवस परिणाम

प्रस्तावावरील भाषणादरम्यान शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी दरवाढीला विरोध केला. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळले आहे. अशातच शहरात दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.

या छुप्या पाणीकपातीमुळे पाणीपुरवठा बंद नंतर, पुढील दोन- तीन दिवस शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होतो. पुणेकरांना पाणी न देताच करवाढ करणे अन्यायकारक आहे.

पाणीकपातीचा महापालिकेला फटका

पुणे : महापालिकेतील सत्ताधाºयांकडून शहरात कोणत्याही परिस्थितीत पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी गुरुवारी महापालिकेलाच पाणीकपातीचा फटका बसला. गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद असल्याने महापालिकेच्या मुख्य इमारतीत
पाणीटंचाई निर्माण झाली. अखेर प्रशासनाने महापालिकेतील कर्मचारी व येणाºया नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला.
प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या
दीड-दोन महिन्यांपासून पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्या भांडणामध्ये खडकवासला प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असताना पुणेकरांना पाणीकपात सहन करावी लागत आहे.
पुणेकर मंजुरी कोट्यापेक्षा अधिक पाणी घेतात, असे सांगत पाटबंधारे विभागाने आतापर्यंत तीन वेळा शहराचा पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर प्रत्येकवेळी पुणेकरांचे एक थेंबदेखील पाणीकपात करू देणार नाही, असे आश्वासन महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या वतीने देण्यात आले. परंतु, गुरुवारी (दि.९) रोजी शहरात सुरू असलेल्या अघोषित पाणीकपातीचा स्वत: महापालिकेला फटका बसला.
महापालिकेच्या मुख्य इमारतीत गुरुवारी पाणीच न आल्याने प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला.

शहरात पाणीकपात नाहीच
नागरिकांना जास्तीत जास्त व योग्य पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज १३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे;परंतु पाणीपुरवठ्यातील गळती रोखण्यासाठी व आवश्यक दुरुस्तीसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो; पण दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद केला जात नाही. गुरुवारी शहरात
पाणीपुरवठा बंद असल्याने महापालिकेत देखील पाणी आले नाही; परंतु महापालिकेतील कर्मचारी व नागरिकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
-मुक्ता टिळक, महापौर

अघोषित पाणीकपातीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

पुणे : दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाकडून शहरात करण्यात आलेल्या अघोषित
पाणीकपातीच्या निषेधार्थ गुरुवारी रोजी महापालिकेच्या सभागृहात शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या वेळी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
या वेळी शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले की, पुणे शहराचे पाणीनियोजन करण्यात सत्ताधारी भाजपा अपयशी ठरले असून, दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. ही निषेधार्थ बाब असून, पुणे नागरिकांना नेहमीप्रमाणे पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारादेखील त्यांनी या वेळी दिला. पुणेकरांना पाणी मिळत नसताना प्रशासनाकडून मात्र पाणीपट्टीत तब्बल १५ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेनेचा पूर्ण विरोध असल्याचे भोसले यांनी सांगितले.

Web Title: Water in Pune is not enough; Water Supply Increase by 15%, BJP approves water bill increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.