विदेशी तंत्रज्ञानावर आधारित जल शुद्धीकर यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 07:59 PM2018-08-08T19:59:18+5:302018-08-08T20:00:26+5:30
हे यंत्र पूर्णत: स्वयंचलित असल्याने पाण्यामध्ये क्लोरीन किती आहे याबाबत नियमित एसएमएस मोबाईलवर येण्याची सोय आहे...
भूगाव : दिवसेंदिवस वाढत असलेल्या अशुद्ध पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून मुळशी तालुक्यातील भुगाव ग्रामपंचायतीने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित निर्जंंतुकीकरण यंत्र बसविले आहे. पाण्यात टाकण्यासाठी पूर्णत: स्वयंचलित यंत्रामार्फत पाण्यातील क्लोरिन नियमित राहणार आहे.
आधी पाण्याच्या टाकीमध्ये टीसीएल पावडर टाकली जात होती. परंतु, ही पावडर टाकण्यासाठी मनुष्यबळाची गरज होती. तसेच पावडर पाण्यामध्ये व्यवस्थित न विरघळता तळाला तशीच राहत होती. या यंत्रामार्फत जल निर्जंंतुकीकरण हे प्रमाणबद्ध होणार असून पाण्यातील क्लोरिन नियमित राहणार आहे. हे यंत्र पूर्णत: स्वयंचलित असल्याने पाण्यामध्ये क्लोरीन किती आहे याबाबत नियमित एसएमएस मोबाईलवर येण्याची सोय आहे.
यामुळे गावाला नियमित निर्जंतुक पाणी मिळेल. यंत्र सध्या प्रायोगिक तत्वावर बसवले असून कायमस्वरूपी बसवण्यास भूगाव ग्रामपंचायत इच्छुक आहे. सदर योजना भूगाव ग्रामपंचायत व इसॉल प्राईवेट लिमिटेड यांच्या पुढाकाराने चालू केली आहे. हे यंत्र अनेक विकसित व विकसनशील देशांमध्ये सक्रीय आहे.
या योजनेची पाहणी करतेवेळी आदर्श सरपंच विजय सातपुते, उपसरपंच जयश्री कुंभार, माजी उपसरपंच सुरेखा कांबळे, माजी उपसरपंच प्रमिला चोंधे, आशिष मिरघे, सुरज शेडगे, अंकुश येनपुरे व इसॉल कंपनीचे संस्थापक अभिताभ होनप आणि कर्मचारी उपस्थित होते.