आश्रमशाळेत वॉटर प्युरिफायर बसलेच नाहीत

By admin | Published: January 5, 2016 02:32 AM2016-01-05T02:32:23+5:302016-01-05T02:32:23+5:30

आश्रमशाळेमध्ये बसविण्यात येणाऱ्या वॉटर प्युरिफायर व रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. संबंधित ठेकेदाराने या कामापोटी दहा लाख रुपये घेऊन काम

Water Purifiers have not been installed in Ashramshala | आश्रमशाळेत वॉटर प्युरिफायर बसलेच नाहीत

आश्रमशाळेत वॉटर प्युरिफायर बसलेच नाहीत

Next

घोडेगाव : आश्रमशाळेमध्ये बसविण्यात येणाऱ्या वॉटर प्युरिफायर व रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. संबंधित ठेकेदाराने या कामापोटी दहा लाख रुपये घेऊन काम अपूर्ण ठेवले व शासनाची फसवणूक केली म्हणून प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी ठेकेदार मारुती डुबाजी वायाळ यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
घोडेगाव येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असून, या अंतर्गत चार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा व वसतिगृह येतात. विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून आश्रमशाळांमध्ये वॉटर प्युरीफायर व रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याची योजना सन २०११मध्ये मंजूर झाली होती. हे काम आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मारुती वायाळ या ठेकेदाराला दिले होते.
या ठेकेदाराने वॉटर प्युरीफायरसाठी नुसते कठडे बांधून ठेवले, मात्र पुढचे काहीच काम केले नाही. या कामापोटी आठ लाख रुपये वॉटर प्युरीफायरसाठी तर दोन लाख रुपये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी संबंधित ठेकेदाराला तत्कालीन प्रकल्प अधिकारी यांनी दिले आहेत.
याबाबत प्रकल्प कार्यालयाने चौकशी केली असता संबंधित ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवल्याचे आढळून आले.
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनीदेखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. प्रकल्प कार्यालयाने संबंधित ठेकेदाराला नोटिसा बजावल्या; मात्र त्यांनी काहीच उत्तर दिले नाही व कामही पूर्ण केले नाही. म्हणून संबंधित ठेकेदारावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे
प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी सांगितले. तसेच या ठेकेदाराने घरकुलाची योजनाही अशीच अपूर्ण ठेवलेली असून, याप्रकरणी लवकरच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करत असून, संबंधित ठेकेदार मारुती वायाळ याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Water Purifiers have not been installed in Ashramshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.