खडकवासला धरणातून दौंडसाठी पाणी

By admin | Published: November 16, 2015 02:02 AM2015-11-16T02:02:21+5:302015-11-16T02:02:21+5:30

खडकवासला धरणातून दौंडला पिण्याच्या पाण्यासाठी रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून कॅनॉलमधून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे

Water for the quarrel from the dam | खडकवासला धरणातून दौंडसाठी पाणी

खडकवासला धरणातून दौंडसाठी पाणी

Next

पुणे /दौंड : खडकवासला धरणातून दौंडला पिण्याच्या पाण्यासाठी रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून कॅनॉलमधून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुढील ६ दिवस दौंडला कॅनॉलमधून अर्धा टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी़ बी़ लोहार यांनी दिली़ उद्या हे पाणी दौंडला पोहोचणार आहे.
दौंड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये केवळ ५५ ते ६० एमएलडी पाण्याचा साठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे दौंडसमोर पाण्याचे मोठे संकट उभे राहिले होते. त्यामुळे तातडीने दौंडसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून कॅनॉलमधून पाणी सोडले जात आहे. कॅनॉलमधून पाटस, केडगाव, कळस, अकोलेमार्गे दौंडला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये हे पाणी जाणार आहे.
दौंड शहरातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. दौंड शहराच्या बाहेरून काही किलोमीटर अंतरावरून दुचाकी, मोटारीमधून पाणी आणले जात आहे. दौंडसाठी सोडलेले पाणी तलावामध्ये पोहोचल्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. दौंडला पिण्यासाठी खडकवासला धरणातून पाणी मिळावे याकरिता पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. यंदा खूपच कमी पाऊस झाल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये पाणीकपात लागू करण्यात आली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. धरणांमध्ये सध्या उपलब्ध असलेले पाणी जुलै २०१६ पर्यंत म्हणजे साडेआठ महिने पुरवून वापरावे लागणार आहे.
विशेषत: उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा खूपच जपून वापर करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water for the quarrel from the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.