पाणी ओसरले अन् दिसले पाण्याखाली दडलेले मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 05:50 AM2024-04-16T05:50:18+5:302024-04-16T05:51:04+5:30
पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणामधील पाणी कमी झाल्याने तेथील नागोबा मंदिराचे दर्शन सर्वांना होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, भोर (जि. पुणे) : भाटघर धरणातील पाणी कमी झाल्याने जुन्या वेळवंड (ता. भोर) येथील पांडवकालीन नागोबाचे मंदिर पाहण्यास मिळत आहे. धरणातील पाणीसाठा जसजसा कमी होऊ लागला तसे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुरातन मंदिरे दिसू लागली आहेत. भाविक देवदर्शन घेण्यासाठी येत आहेत.
भोरपासून १८ किलोमीटरवर वेळवंडी नदीवर ब्रिटिशकालीन भाटघर धरण बांधण्यात आले. त्यावेळी ४० गावांतील ५ हजार ६७१ एकर जमीन संपादित करण्यात आली. त्यावेळी पाणलोट क्षेत्रातील गावे स्थलांतरित करण्यात आली. तरी जुन्या आठवणी तशाच राहिल्या आहेत. या गावाच्या जुन्या खुणा आजही आपल्याला पाणी कमी झाल्यावर पाहावयास मिळतात.
प्राचीन वारसा जतन करण्याची गरज
- पांडवकालीन नागोबाचे मंदिर दहा महिने पाण्यामध्ये असते. मंदिरासमोर पार्वती मातेची मूर्ती व नंदी आहे.
- धरण भागात पाऊस जास्त असल्याने दरवर्षी पावसामुळे धरणातील गाळ व पाणी गाभाऱ्यामध्ये साचून राहते. गाभारा व मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे.
- मंदिराच्या कळसाचे बांधकाम चुनखडी व वाळूमध्ये केलेले आहे. हा प्राचीन काळातील सांस्कृतिक वारसा जतन करण्याची काळाची गरज असल्याचे वेळवंड परिसरातील ग्रामस्थ सांगतात.