धरणातून पाण्याचा विसर्ग, पुण्यात पुन्हा पूर; नागरिक सुरक्षितस्थळी, प्रशासन अलर्ट मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 09:13 PM2024-08-04T21:13:37+5:302024-08-04T21:15:20+5:30
अग्निशमन दलाकडून पुरपरिस्थिती निर्माण होणारया ठिकाणी मेगाफोन्सद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या.
पुणे - राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून सायंकाळी पाच वाजता ४५ हजार क्युसेकने विसर्ग वाढविला असल्याने आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दल अलर्ट मोडवर होते.
पाण्याची पातळी वाढत असल्याने पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सिंहगड रस्ता एकता नगरी येथे मेगाफोन्स वापरत विसर्गाबाबत पूर्वसूचना देण्यात येत होत्या. त्याचबरोबर त्याठिकाणी तीन बोटी ही दाखल करण्यात आल्या होत्या. निंबोज नगर येथे ही दलाचे जवान कार्यरत होते. या सर्व घटनेत टॉर्च, रश्शी, मेगाफोन्स, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, बोटी याचा वापर होत आहे. तसेच दत्तवाडी घाट, भिडे पूल, पुलाची वाडी, विश्रांतवाडी टँक रोड, आदर्शनगर, शांतीनगर, ताडीवाला रोड, शिवाजीनगर पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर अशा विविध भागात दलाचे जवान कार्यरत होते. दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
एकता नगरी ३५ व निंबोज नगर २५ तर येरवडा आदर्शनगर व शांतीनगर येथून पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सुमारे १०० नागरिक अशा एकुण सुमारे १६० जणांना आत्तापर्यंत अग्निशमन दलाने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शहर परिसरात १५ झाडपडीच्या घटना (निलायम थिएटर, सादलबाबा चौक, वाकडेवाडी, भांडारकर रोड, गणेश पेठ, अरणेश्वर मंदिर, संगमवाडी रोड, लुल्लानगर, गोखलेनगर, बाणेर रोड, ससून रोड, खडकी, पाषाण, लॉ कॉलेज रोड, कोरेगांव पार्क) येथे घडल्या असून काही ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर वाहने काढली असून रस्ता मोकळा करुन दिला आहे. यामध्ये जखमी कोणी नाही.
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, पुण्यातील सिंहगड रस्ता एकता नगरी इथं पूरजन्य स्थिती, लोक सुरक्षित, प्रशासन अलर्ट #Pune#Rainpic.twitter.com/ZD9ztIvwID
— Lokmat (@lokmat) August 4, 2024
"अग्निशमन दलाकडून पुरपरिस्थिती निर्माण होणारया ठिकाणी मेगाफोन्सद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. आमचे माझ्यासह २० अधिकारी व जवळपास ३०० जवान विविध ठिकाणी कार्यरत आहोत." - देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका.
सध्याची स्थिती
- नायडू अग्निशमन केंद्र - अधिकारी विजय भिलारे - बर्निंग घाट/ताडीवाला रोड - परिस्थिती नियंञणात
- काळे बोराटे नगर अग्निशमन केंद्र - अधिकारी अनिल गायकवाड - पाटील इस्टेट झोपडपट्टी - परिस्थिती नियंञणात
- नवले अग्निशमन केंद्र - अधिकारी प्रकाश गोरे - निम्मज नगर - परिस्थिती नियंञणात
- जनता अग्निशमन केंद्र - अधिकारी प्रदिप खेडेकर - दत्तवाडी घाट - परिस्थिती नियंञणात
- वारजे अग्निशमन केंद्र - अधिकारी सचिन मांडवकर - तपोधाम वारजे - परिस्थिती नियंञणात
- येरवडा अग्निशमन केंद्र - अधिकारी सुभाष जाधव - शांतीनगर/आदर्शनगर - परिस्थिती नियंञणात
- कसबा अग्निशमन केंद्र - अधिकारी कमलेश चौधरी - भिडे पुल - परिस्थिती नियंञणात
- एंडरवणा अग्निशमन केंद्र - अधिकारी राजेश जगताप - पुलाची वाडी/रजपुत वीटभट्टी - परिस्थितीत नियंञणात
- सिहंगड अग्निशमन केंद्र - अधिकारी प्रभाकर उम्राटकर - एकता नगरी - परिस्थिती नियंञणात
- पीएमआरडीए अग्निशमन दल - अधिकारी विजय महाजन - एकता नगरी व विश्रांतवाडी याठिकाणी कार्यरत