टेमघर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 08:27 PM2018-11-03T20:27:04+5:302018-11-03T20:28:28+5:30
पुणे शहराला पाणी पुरवठा करणारा खडकवासला धरणासाखळीतील एक असलेल्या टेमघर धरणातील विसर्ग थांबविण्यात आला आहे.
पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणारा खडकवासला धरणासाखळीतील एक असलेल्या टेमघर धरणातील विसर्ग थांबविण्यात आला आहे. मात्र, खडकवासला धरणातील पाणी कमी झाल्यानंतर धरणातून पुन्हा विसर्ग सोडला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. सध्या धरणात ०.२५ टीएमसी एवढा धरणसाठा शिल्ल्क आहे.
टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्यामुळे जलसंपदा विभागातर्फे धरणाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. पावसाळ्यात धरणात सुमारे ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, दुरूस्तीच्या कामामुळे धरणातील पाणी खडकवासल्यात सोडण्यात आले. मात्र,सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा कमी केला नाही, तरीही दुरूस्तीचे काम करता येऊ शकते.त्यामुळे धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.परंतु,आवश्यकता भासल्यानंतर तात्काळ खडकवासला धरणात उर्वरित पाणी सोडले जाणार आहे.
सध्या वापरल्या जाणा-या दुरूस्तीच्या पध्दतीनुसार दरवर्षी धरणाची दुरूस्ती करावी लागू शकते. त्यामुळे विभागाकडून नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धरणाची गळती थांंबविण्याचा विचार सुरू आहे. परंतु,शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीसमोर पुढील महिन्यात याबाबतचे सादरीकरण करून त्यास मान्यता घेतल्यानंतरच नवीन तंत्रज्ञानानुसार दुरूस्ती केली जाणार आहे. तमिळनाडू येथील कदम पराई या धरणाच्या दुरूस्तीसाठी जीओ मेंबरेन हे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून याच तंत्रज्ञानाचा वापर टेमघरची गळती रोखण्यासाठी केल्यास उपयुक्त ठरू शकते.