पोलीस बंदोबस्तात भामा आसखेड धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 09:09 PM2018-04-09T21:09:04+5:302018-04-09T21:09:04+5:30

शेतकऱ्यांचे आंदोलन पोलीसबळाचा वापर करून मोडीत काढण्यास  धरण प्रशासनाने सुरुवात केली आहे. आज भामा- आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये धरणामधून पाणी सोडले. 

Water released from bhama aaskhed dam in under police force | पोलीस बंदोबस्तात भामा आसखेड धरणातून सोडले पाणी

पोलीस बंदोबस्तात भामा आसखेड धरणातून सोडले पाणी

Next
ठळक मुद्देभामा-आसखेड धरण : आंदोलन आणखी चिघळणारभामा-आसखेडला छावणीचे स्वरूप 

खेड : पाईट( ता. खेड ) येथील धरणग्रस्त आंदोलकांनी तीन दिवसांपूर्वी बंद केलेले भामा-आसखेड धरणातील पाण्याचे आवर्तन सोमवारी पुन्हा पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले. यात १00 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आंदोलक संतापले असून, मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. 
शेतकऱ्यांचे आंदोलन  पोलीसबळाचा वापर करून मोडीत काढण्यास  धरण प्रशासनाने सुरुवात केली आहे. आज भामा- आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये धरणामधून पाणी सोडले. 
५ एप्रिल रोजी धरण प्रशासनाने सोडलेले आवर्तन शेतकऱ्यांनी ६ एप्रिलला बंद केले होते. यावर भामा-आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने १११ धरणग्रस्त शेतकऱ्यांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. 
आज भामा-आसखेड सिंचन विभाग उपविभाग करंजविहिरे, यांनी पाणी सोडण्याची सर्व तयारी करुन सकाळी ११ वाजता सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंते लोंढे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, शाखा अधिकारी भारत बेंद्रे, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, तहसीलदार सुनील जोशी, चाकण पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, मंडल अधिकारी हरिचंद्र सोनवणे आदींच्या उपस्थितीत पुन्हा पाणी सोडण्यात आले. सायंकाळी पाणी सोडण्याचा वेग वाढवून ८०० क्युसेक्सवर नेला होता. आवर्तन १५ दिवस सोडण्यात येणार आहे. यामध्ये खेड तालुक्यातील १० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून शिरूर व हवेली तालुक्यातील ४ आणि दौंड तालुक्यातील ४ बंधारे भरण्यात येणार आहेत. 

भामा-आसखेडला छावणीचे स्वरूप 
भामा-आसखेड धरणावर धरणग्रस्तांच्या आंदोलनाला मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ७० पोलिसांचा खडा पहारा ठेवला आहे. यामध्ये २ सीआरपीएफच्या तुकड्या, १ जिल्हा पोलीस दलाची राखीव तुकडी व १४ महिला कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. धरणावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे . या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

 

Web Title: Water released from bhama aaskhed dam in under police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.