पुणे | गेल्या वर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी पाणीसाठा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 05:00 PM2022-05-14T17:00:00+5:302022-05-14T17:55:38+5:30
सध्या खडकवासला धरणातून उन्हाळी पिकांसाठी तिसरे आवर्तन सुरू आहे...
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात सद्य:स्थितीत सुमारे ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, तो वेळेवर आल्यास पुणेकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार नाही, अशी शक्यता आहे.
खडकवासला प्रकल्पातील वसरगाव धरणात यंदा एकूण पाणीसाठ्याच्या ३१ टक्के साठा म्हणजेच ३.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे, तर पानशेतमध्ये ३२.६९ टक्के (३.४८ टीएमसी), टेमघरमध्ये ११.२२ टक्के (०.४२ टीएमसी) तसेच खडकवासला धरणात ३७.१५ टक्के (०.७३ टीएमसी) साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातील एकूण साठा हा २९७.७४ दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त जलसाठा २४३.५५ दशलक्ष घनमीटर इतका आहे. गेल्यावर्षी याच काळात ३६.२९ टक्के (१०.५८ टीएमसी) पाणीसाठा होता.
सध्या खडकवासला धरणातून उन्हाळी पिकांसाठी तिसरे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी घट होणार आहे. तरीदेखील शहराला १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन जलसंपदा विभागाचे आहे.