जलसंपदाकडून पाणी बंद करण्याचा पुन्हा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:19 AM2018-03-16T00:19:57+5:302018-03-16T00:19:57+5:30
शहरासाठी घेत असलेल्या पाण्याची थकबाकी जमा केली नाही तर पाणी देणे बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.
पुणे : शहरासाठी घेत असलेल्या पाण्याची थकबाकी जमा केली नाही तर पाणी देणे बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. ३४५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे जलसंपदाचे म्हणणे असून, महापालिकेने वादग्रस्त व चुकीच्या पद्धतीने पाणी मोजले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
खडकवासला धरणातून महापालिका पुण्यासाठी पाणी घेते. सर्व धरणे जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे उचललेल्या पाण्यासाठी जलसंपदा विभाग शुल्क आकारते. त्यासाठीचे ३५४ कोटी रूपये महापालिकेकडे बाकी आहेत असे जलसंपदाचे म्हणणे आहे. त्यात या वर्षीचे पैसे जमा करून एकूण ३९५ कोटी रूपये जलसंपदाने महापालिकेला मागितले आहेत.
यापूर्वीही असे इशारापत्र जलसंपदाने महापालिकेला पाठवले होते. पाण्यासाठी महापालिकेबरोबर करार झाला आहे, त्यानुसार ते पाणी घेत नाहीत, जास्तीचे पाणी त्यांच्याकडून घेतले जाते. त्या पाण्याची बिले देणे अपेक्षित आहे, तसे बिल मिळत नसल्याने पत्र पाठवावे लागते, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. बी. शेलार यांनी सांगितले.
>महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले की जलसंपदाची सर्व बिले वाढीव आहेत. त्यांनी पाणी चुकीच्या पद्धतीने मोजले आहे. महापालिका जादा पाणी घेत नाहीत. त्यांच्याकडे सविस्तर बिलाची माहिती मागवली आहे. त्यानंतर याबाबत सर्व काही स्पष्ट होईल.