जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 05:27 PM2019-01-16T17:27:39+5:302019-01-16T17:29:28+5:30
जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी पुन्हा एकदा बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाइप लाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी थांबवले आहे.
पुणे: जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी पुन्हा एकदा बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाइप लाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी थांबवले आहे. वारंवार सूचना देऊन व पत्रव्यवहार करूनही पालिकेकडून पाण्याचा वापर कमी केला जात नसल्याने पालिकेचे दोन पंप जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बंद केले आहेत.
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यासह पुणे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे .गेल्या काही दिवसांपासून पालिका व जलसंपदा विभागात पाणी वितरणावरून वाद सुरू आहे. हा वाद प्राधिकरणापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला. खडकवासला धरण प्रकल्पात पाणीसाठा कमी असल्याने शेतीला व पिण्यासाठी 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने वारंवार पालिकेच्या अधिकाऱ्यांना धरणातून नियमानुसार पाणी उचलावे, अशा सूचना दिल्या होत्या मात्र, त्यात बदल झाला नाही.
पालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही पालिकेकडून पाणी कपात केली जात नव्हती ; उलट पाण्याचा वापर जास्तच केला जात असल्याचे दिसून आले. बुधवारी पालिकेने 1402 एमएलडी पाणी घेतले. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार पालिकेने 892 एमएलडी पाणी उचलणे अपेक्षित आहे .परंतु ,पाण्याचा वापर जास्त होत असल्याने जलसंपदा विभागाने पंप बंद करण्याची कार्यवाही केली.
येत्या 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेतला पंपाद्वारे पाइपलाइनच्या माध्यमातून पर्वती केंद्राला दिले जाणारे 250 एमएलडी पाणी बुधवारी दुपारी 3 वाजता थांबविले आहे.
-पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता खडकवासला धरण प्रकल्प,